जळगाव : शहरातील तांबापुरातील एका टपरीच्या आडोशाला बसून सट्टा जुगाराचे आकडे घेणाऱ्यास एमआयडीसी पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. त्याच्याकडून १ हजार १८० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून, त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील तांबापुरा भागातल्या मच्छीबाजारातील एका टपरीच्या आडोशाला नईम रहिम पठाण (२९, रा. मच्छीबाजार) हा युवक परिसरात चिठ्ठ्यांवर सट्टा जुगाराचे आकडे घेत असल्याची माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण पाटील यांना मिळाली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली गोविंदा पाटील, अतुल वंजारी, इम्रानअली सैयद, सचिन पाटील, योगेश बारी यांचे पथक तयार करण्यात आले. या पथकाने मच्छीबाजारात जाऊन धाड टाकली असता त्याठिकाणी नईम रहिम पठाण स्वत:च्या फायद्यासाठी सट्ट्याचे आकडे घेत असताना आढळून आला. त्याला अटक करून चौकशी केली असता सलीम मुर्गी यांच्या सांगण्यावरून हे आकडे घेत असल्याचे त्याने सांगितले. त्याच्याकडून १ हजार १८० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून, पोलीस कर्मचारी गोविंदा पाटील यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.