लोकमत न्यूज नेटवर्क
रावेर : दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात दडून बसलेल्या सशस्त्र टोळीवर रावेर पोलिसांनी सापळा रचून झडप घातली असता दोन आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले. मात्र अन्य चौघे अंधाराचा गैरफायदा घेऊन पसार झाले.
रविवारी रात्री दीड वाजेच्या सुमारास ही घटना घडली. संबंधित सहाही आरोपींविरुद्ध दरोडा टाकण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी रावेर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. असून, पोलिसांनी दरोडेखोरांचा डाव उधळून लावल्याने कौतुक होत आहे. पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांना खबरीकडून नवीन शासकीय विश्रामगृहाच्या पाठीमागे असलेल्या अजंदा रस्त्यालगतच्या नाल्याजवळ शस्त्रधारी संशयित पाच ते सहा जण दरोडा टाकण्याच्या वा रस्तालुटीच्या तयारीत असल्याची खबर दिली. त्या अनुषंगाने पो. नि. वाकोडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक शितलकुमार नाईक यांच्या नेतृत्वाखाली फौजदार मनोहर जाधव पो ना महेंद्र सुरवाडे, पोकॉ सुनील वंजारी, प्रमोद पाटील, सुरेश मेढे , कुणाल सोनवणे,सुकेश तडवी, विशाल पाटील , मंदार पाटील यांचे पोलीस पथक घेवून घटनास्थळाकडे तातडीने रवाना झाले.
सापळा रचून आरोपी शेख हसन शेख अन्वर वय (२४) रा. फतेहनगर, रावेर हा खिशात लाल मिरची पूड घेऊन तर दुसरा आरोपी गोलू उर्फ अब्दुल अकिल अब्दुल शकील ( २५) रा हुसैनी मस्जिद जवळ, रावेर यास छोट्या चाकुसह पोलीसांनी ताब्यात घेतले. दरम्यान, उर्वरित त्यांचे चार साथीदार आकाश लक्ष्मण रिल, शे बाबा शेख कलीम, शे अक्रम उर्फ मिठाई शे मुस्ताक, तिबु उर्फ इस्माईलखान याकूब खान सर्व रा. रावेर हे पसार झाले. पकडलेल्या दोन्ही आरोपींना रावेर न्यायालयासमोर उभे केले असता न्या. आर. एल. राठोड यांनी दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.