लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : प्रतिबंधित असलेला गुटखा साठवून ठेवून विक्री करणा-या चार दुकांनावर मंगळवारी प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक नितीन गणापुरे यांच्यासह एमआयडीसी पोलिसांच्या पथकाने छापा मारला. या कारवाईत पोलिसांनी १ लाख १८ हजार ८९६ रूपयांचा आरएमडी, गुटखा, पानमसाला जप्त केला आहे. तसेच संबंधित दुकान चालकांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शेरा चौकातील समर्थ कृपा प्रोव्हीजन येथून ३४ हजार ५३८ रूपयांचा प्रतिबंधित पानमसाला, गुटखा, सिगारेट, आरएमडी जप्त करण्यात आले. दुसर्या कारवाईत पटेल प्रोव्हीजन येथे छापा टाकला़ या दुकानातून १६ हजार २६८ रूपयांचा प्रतिबंधित जर्दा, गुटखा, तंबाखु, पानमसाला जप्त करण्यात आला.
तिसर्या कारवाईत याच भागातील गणेश ट्रेडर्स येथे छापा मारला. याठिकाणी बाबुलाल पांडुरंग खांदे (४९, रा.अयोध्या नगर) याच्याकडून ५४ हजार ४९० रूपयांचा पानमसाला, तंबाखु जप्त करून सील केला.
सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास पोलिसांनी ईच्छादेवी चौकातील खुशी ट्रेडर्स येथे छापा टाकला़ रमेश चेतवाणी हा घटनास्थळावरून पसार झाला. त्याच्या दुकानातून १५ हजार ६०० रूपयांचा प्रतिबंधित पानमसाला जप्त केला आहे.
या प्रकरणी दीपक गगराळे, शेख फरीद शेख नशीर, बाबुलाल पांडुरंग खांदे, छोटु नसीर पटेल, रमेश जेठानंद चेतवाणी यांच्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. यातील तीन ते चार जणांना अटक करण्यात आली आहे.