जळगाव : कौटुंबिक वादातून निर्माण झालेल्या मालमत्तेचा वाद थेट दिव्यांग दांपत्याला आत्महत्येसारख्या टोकाच्या निर्णयापर्यंत घेऊन गेला. याची भनक लागताच पोलिसांची गिरणा नदीपात्रात शोध मोहीम राबवविली अन् आत्महत्येच्या ठिकाणापर्यंत पोहचायला फक्त एक मिनिट बाकी असतानाच पोलिसांनी दोघांना गाठले. घरी रडणाऱ्या १२ वर्षाच्या मुलाचा व्हिडिओ कॉल दाखविला, तरीही दांपत्य निर्णयापासून मागे हटायला तयार नव्हते. कशी तरी समजूत घालून पोलिसांनी त्यांना घरी माघारी आणले. ही घटना बुधवारी दुपारी पाचोरा तालुक्यात घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरपूर तालुक्यातील एका खेडेगावातील एक दिव्यांग तरुण पाचोरा येथे सरकारी कार्यालयात नोकरीला आहे. पत्नी देखील दिव्यांग असून तिचे माहेर पाचोरा तालुक्यातील आहे. शिरपूर तालुक्यात दिव्यांग तरुणाची आई व भाऊ असे वास्तव्याला आहेत. आई व भावाचा संपूर्ण खर्च हा कर्मचारी करतो. वडिलोपार्जित मालमत्ता व आईच्या नावाच्या मालमत्तेवर भावाने हक्क मागितला व त्यावरून वाद निर्माण झाला. त्यामुळे दोन दिवसांपूर्वीच हे दांपत्य घरी गेले होते. भाऊची समजूत घातली तरी देखील ऐकायला तयार नाही. संसार व इतर सर्व गोष्टीची पूर्तता आपणच करतो, तरी देखील मालमत्तेवरून दरी निर्माण होत असल्याने हे दांपत्य बुधवारी पाचोऱ्यात आले आणि आम्ही आत्महत्या करून जीवन संपवितो. तुम्हीच ती मालमत्ता घ्या..असे नातेवाइकांना सांगून घराबाहेर पडले.
गावाकाठी आढळली दिव्यांगाची दुचाकी
एक सुशिक्षित दिव्यांग दांपत्य कौटुंबिक वादातून आत्महत्या करायला गेले आहे व घरी त्यांचा १२ वर्षाचा मुलगा रडतोय..आई, वडिलांना कॉल करतोय पण ते प्रतिसाद देत नाही, अशी माहिती पोलीस कर्मचारी राहुल बेहरे यांना एका मित्राने सांगितली. आईला दवाखान्यात घेऊन आलेल्या बेहरे यांनी आईला तेथेच सोडून तत्काळ पोलीस ठाणे गाठले. पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांना घटना कथन केली. उपनिरीक्षक दत्तात्रय नलावडे व बेहरे दोघांच्या शोधार्थ निघाले तर दुसरीकडे पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांच्याही कानावर ही घटना घालून दोघांचे लोकेशन कळविण्याची विनंती केली. स्थानिक गुन्हे शाखेचे किरणकुमार बकाले, सहायक फौजदार विजय पाटील, नरेंद्र वारुळे व संदीप साळवे यांनी तंत्रज्ञानाचा वापर करून दोघांची माहिती काढली असता बांबरुड (महादेवाचे) या गावाजवळचे लोकेशन मिळाले. नलावडे व बेहरे यांनी त्या दिशेने मोर्चा वळविला असता या दांपत्याची तीन चाकांची दुचाकी रस्त्यावरच आढळून आली. तेथूनच गिरणा नदीकडे जायचा रस्ता असल्याने पोलीस त्या दिशेने निघाले.