लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : गेल्या काही दिवसांत शहरात दुचाकी चोरी व गँगवारच्या घटना वाढल्या आहेत. या घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस दलाने शनिवारी सकाळी संपूर्ण शहरात अचानक कोम्बिंग ऑपरेशन राबवले. यात तब्बल ४१६ वाहनांची तपासणी करण्यात आली असून त्यामध्ये २८ संशयित वाहने पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत.
पोलिसांकडून शनिवारी सकाळी सात ते दहा वाजेपर्यंत कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आले. यात रामानंदनगर, शहर, जिल्हापेठ, एमआयडीसी, तालुका पोलीस ठाणे, शहर वाहतूक पोलीस शाखा व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आपापल्या हद्दीत तपासणी सुरू केली. तीन पोलीस निरीक्षक, १४ दुय्यम अधिकारी व १४० पोलीस कर्मचाऱ्यांनी एकाच वेळी शहरातील गेंदालाल मिल, कांचननगर, जैनाबाद, पिंप्राळा हुडको, तांबापुरा, मास्टर कॉलनी या भागातील रेकॉर्डवरचे गुन्हेगार, हद्दपार आरोपी तसेच वाहनांची तपासणी केली.
- वेगवेगळ्या भागांमध्ये पोलिसांनी रेकॉर्डवरच्या २४ गुन्हेगारांची तपासणी केली. तसेच ११ पैकी १ हद्दपार आरोपी शहरात बेकायदेशीपणे वास्तव्यास असल्याचे आढळून आले. त्यास ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला.
- दुचाकी चोरीच्या घटना वाढल्यामुळे पोलिसांनी सर्वांत आधी सकाळी वेगवेगळ्या भागातील दुचाकींची तपासणी केली. त्यात ४१६ वाहनांची तपासणी करण्यात आली. यातील २८ संशयित वाहने पोलिसांनी जप्त केली आहेत. या वाहनांची संपूर्ण चौकशी केल्यांनंतरच परत केली जाणार आहेत. मालकांना या वाहनांची मूळ कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत.
- वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या ४५ वाहनचालकांकडून ९ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तसेच अवैध मद्यविक्री करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल करण्यात आला.