ऑनलाईन लोकमत
जळगाव,दि.25 : मालमत्तेच्या वादावरुन दोन पोलीस भावांमध्ये चक्क पोलीस स्टेशनमध्येच शनिवारी रात्री 12 वाजेच्या सुमारास जोरदार वाद झाले. ते वरिष्ठ पोलीस अधिका:यांनाही जुमानत नसल्याने त्यांच्यातील वाद मिटविण्याठी जिल्हा पोलीस अधीक्षकांना रामानंद पोलीस स्टेशनमध्ये धाव घ्यावी लागली.
जळगाव व धरणगाव येथे पोलीस हेड कॉस्टेबल म्हणून दोन्ही भाऊ कार्यरत आहेत. त्यांची मुलेही पोलीस आहेत. या दोन्ही भावांमध्ये पिंप्राळ्यातील मालमत्तेवरुन वाद आहे. यापैकी एकाने शनिवारी दुपारी रामानंद पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली. याबाबतची माहिती मिळताच दुस:या भावानेही रात्री पोलीस स्टेशन गाठले. तेथे दोन्ही भाऊ ठाणे अंमलदारासमोर आले. त्यांच्यात वाद झाला. एकमेकांच्या अंगावर धावून गेले. वाद मिटत नसल्याने निरीक्षक बी.जी. रोहम यांनी त्यांची समजूत घातली. मात्र त्यांनाही ते जुमानत नसल्याने डीवाय.एस.पी.सचिन सांगळे यांना बोलविण्यात आले. त्यानंतरही धिंगाणा सुरुच होता. याबाबतची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांना मिळाल्याने रात्री 12 वाजता त्यांनी रामानंद पोलीस स्टेशन गाठले. त्यांनी त्या दोघा भावांची समजूत घातली. कडक कारवाईचा इशारा दिल्याने ते नरमले.