बोदवड : पोलीस उपनिरीक्षकाने हातगाडीचालकाच्या कानशिलात लगावल्याची घटना बोदवड येथे बुधवारी दुपारी घडली. सूत्रांनुसार, शहरातील टांगा स्टँड परिसरात हातगाडी लावणाऱ्या लोटगाडीधारकांना पोलीस वाहनावर चालक असलेल्या महेंद्र लहासे तसेच वसीम तडवी यांनी सर्व पोलीस ठाण्यात या, असे सांगून गेले होते. त्यात सय्यद लुकमान बागवान, शेख इसाक बागवान, रवींद्र धनगर, किरण कपले हे पोलीस ठाण्यात गेले. परंतु उशिरापर्यंत गुप्ता व्यापारी संकुलाजवळ असलेला हातगाडीधारक सय्यद युसुफ सय्यद करीम हा गेला नाही. त्याचा राग आल्याने पोलीस उपनिरीक्षक भाईदास मालाचे यांनी त्याच्याजवळ जात ‘काय रे, तुला सांगितलेले कळत नाही का?’ असे सांगून त्याच्या कानशिलात लगावली. त्यात त्याच्या डाव्या कानाला सूज येऊन दुखापत झाली. हा प्रकार त्यांनी शहरातील नगराध्यक्षांचे पती सईद बागवान यांच्याकडे धाव घेतली व झालेला प्रकार सांगितला.सईद बागवान, नगरसेवक सुनील बोरसे तसेच सलीम कुरेशी यांच्यासह शहरातील काही हातगाडीधारक पोलीस ठाण्यात दाखल झाले. पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्याकडे या तरुणाला दाखवले असता त्यांनी समजूत घालत तरुणाला दवाखान्याला पाठवले.पोलीस निरीक्षक गायकवाड यांनी सय्यद युसुफ सय्यद करीम याची समजून घातली.आमदार चंद्रकांत पाटील यांच्याकडे या प्रकरणाची माहिती दिल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली.याबाबत अद्याप गुन्हा दाखल नाही.दरम्यान, सय्यद युसुफ सय्यद करीम याचे पालक गुरुवारी जळगाव येथे जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन माहिती देणार आहेत.
नगरसेवक व नगराध्यक्षांचे पती आपल्याकडे हातगाडीचालकांना घेऊन आले होते. संबंधित तरुणाला लागलेले नाही. परंतु तरीही त्याला दवाखान्याला जाऊन ये, असे सांगितले. उपनिरीक्षकास साप्ताहिक असल्याने त्यांच्याशी दुपारी बोलून घेतले. -राहुल गायकवाड, पोलीस निरीक्षक, पोलीस ठाणे, बोदवड