लोकमत न्यूज नेटवर्क
अमळनेर : धरणगाव तालुक्यातील बांभोरी येथील शेतकऱ्यांकडून चार्जशीट दाखल करण्यासाठी लाच मागणाऱ्या धरणगावच्या पोलिसाने लाचलुचपत विभागाचे व्हॉईस रेकॉर्डर पळवल्याची घटना ६ रोजी रात्री साडेदहा वाजता अमळनेर शहरात हॉटेल देवाज बाहेर घडली.
धरणगाव तालुक्यातील बाम्भोरी येथील भारत छगन पाटील यांच्याविरुद्ध भगवान हरी पाटील यांनी धरणगाव पोलीस स्टेशनला फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. त्यात ते जामिनावर सुटले होते. याप्रकरणात ‘चार्ज शीट दाखल करायचे आहे. तुला जर निर्दोष सुटायचे असेल तर मला १९ हजार रुपये, दे अन्यथा कोर्टात कडक रिपोर्ट पाठवेल, असे सांगत पोलीस नाईक विलास बुधा सोनवणे यांनी भारत पाटील यांच्याकडे २ मार्च रोजी लाचेची केली होती.
भारत पाटील यांनी ५ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. विलास बुधा सोनवणे याने भारत पाटील यास पैसे देण्यासाठी ६ रोजी संध्याकाळी अमळनेर बसस्टँड जवळ बोलावले होते. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पोलीस उपअधीक्षक जी. एम. ठाकूर, पोलीस निरीक्षक निलेश सुरेश लोधी व कर्मचाऱ्यांनी पंच घेऊन भारत पाटील यांच्या गळ्यात व पॅन्टच्या खिश्यात व्हॉइस रेकॉर्डर ठेवून सापळा रचला होता. त्यांनतर विलास सोनवणे याने कोणालाच आणू नको, असे सांगितल्याने भारत त्याच्या मागे मोटरसायकलने बाजार समितीच्या गेट जवळ ९ वाजून ५ मिनिटांनी आले. तेथून ते जवळच असलेल्या देवाज हॉटेलमध्ये जेवायला गेले. त्यांनी जेवण घेतले. कामाविषयी चर्चा केली आणि रात्री साडेदहा वाजता बाहेर पानटपरीवर पान घेण्यासाठी आले, तेव्हा भारत पाटील याने काही रक्कम कमी करा, असे सांगितले. तेव्हा विलासने ‘तुम्हाला जे द्यायचे ते द्या’, असे नाराजीने सांगितले आणि त्याला संशय आल्याने त्याने भारतच्या छातीस हात लावून तपासणी केली असता त्याला ४ हजार रुपये किमतीचे सोनी कंपनीचे सरकारी व्हॉइस रेकॉर्डर हाती लागले.
विलासने झटापट करून व्हॉइस रेकॉर्डर हिसकावून बुलेटवर वेगाने पळून गेला. पथकाने विलासचा शोध घेतला. मात्र तो आढळून आला नाही, म्हणून अखेर लोधी यांनी अमळनेर पोलीस स्टेशनला लाचलुचपत प्रतिबंधक (संशोधन) अधिनियम २०१८ च्या कलम ७प्रमाणे तसेच जबरदस्ती लुबाडणूक करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.