लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : अमृत अंतर्गत सुरु असलेल्या पाणी पुरवठा योजेनेचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. येत्या काही महिन्यांमध्ये सर्व काम पुर्ण होणार आहे. मात्र, मनपा प्रशासनाकडून योजना पुर्ण झाल्यानंतर वॉटरमीटर बसविणे, अपार्टमेंटला एकच की वैयक्तिक नळ कनेक्शन द्यावे की नाही, वाढीव भागात योजनेचे थांबलेले काम अशा बाबी अद्याप पुर्ण कराव्या लागणार आहे. मात्र, मनपा प्रशासन याबाबत दुर्लक्ष करत असून, वॉटरमीटर, नळ कनेक्शनबाबत मनपाचे धोरण निश्चित झालेले दिसून येत नाही.
अमृत अंतर्गत पाईप लाईन टाकण्याचे काम जवळपास ९० टक्के पुर्ण झाले आहे. तसेच मनपा पाणी पुरवठा विभागाकडून नळ देण्याचे काम देखील सुरु केले आहे. मात्र, अपार्टमेंटला केवळ एकच कनेक्शन देण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. या निर्णयाला जून्या अपार्टमेंटमधील रहिवाश्यांचा विरोध असून, अपार्टमेंट रहिवाश्यांना देखील स्वतंत्र कनेक्शन देण्याची मागणी रहिवाश्यांकडून केली जात आहे. याबाबत मनपा महासभा व स्थायी समितीच्या सभेत देखील अनेकवेळा चर्चा होवूनही मनपाकडून अद्यापही धोरण निश्चित करण्यात आलेले नाही. त्यामुळे योजना पुर्ण झाल्यानंतर देखील अनेक अडथळ्यांची शर्यत मनपा प्रशासनाला पार करावी लागणार आहे.
गेल्या सहा महिन्यांपासून निर्णयाची प्रतीक्षा
१. एकीकडे नळ कनेक्शन देण्याचे काम मनपाकडून सुरु झाले असताना दुसरीकडे अपार्टमेंटमधील कनेक्शनबाबत अद्यापही निर्णय झालेला नाही. नव्याने बांधकाम झालेल्या अपार्टमेंटमध्ये सम ची व्यवस्था असल्याने या अपार्टमेंटमध्ये एक किंवा दोन कनेक्शन दिल्यास त्याठिकाणी अडचण येत नाही. तसेच अनेक नवीन अपार्टमेंटमध्ये नळ कनेक्शन देण्यास सुरुवात देखील झाली आहे.
२. शहरात सुमारे १५० ते २०० जुने अपार्टमेंटचे बांधकाम हे ३० ते ३५ वर्षापुर्वीचे आहे. या अपार्टमेंटचे बांधकाम जुन्या नियमानुसार आहे. त्यामुळे संपुर्ण जागेचा वापर बांधकामासाठी केलेला आहे. अनेक ठिकाणी इमारतीचे बांधकाम जुने झाले असून भुमीगत पाण्याची टाकी देखील नाही. नव्याने भुमीगत पाण्याची टाकी करायचे म्हटले तरी पुरेशी जागा नाही. त्यामुळे संपुर्ण इमारतीच्या बांधकामाला धोका पोहचण्याची भिती आहे. त्यामुळे या जुन्या अपार्टमेंटमध्ये नवीन धोरणानुसार नळकनेक्शन कसे द्यायचे हा वादाचा मुद्दा झाला आहे.
वॉटरमीटरबाबत अद्यापही निर्णय नाही
अमृत योजनेअंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे काम अंतिम टप्प्यात आले असले तरी, जळगावकरांना २४ तास पाणीपुरवठा करताना वॉटर मीटर आवश्यकताच राहणार आहेत. मात्र याबाबत अजूनही मनपा प्रशासनाकडून कोणत्याही हालचाली सुरू झालेल्या नाहीत. एका खाजगी कंपनी कडून हे काम करून घेण्यात येणार होते. यासाठी मनपाचा अंदाजपत्रकात देखील ९५ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. मात्र, अजूनही मनपा प्रशासनाकडून कोणत्याही हालचाली सुरू झालेल्या नाहीत.