ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 29 - जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या वक्तव्यांवरून पारोळ्याचे आमदार डॉ. सतीश पाटील व नगराध्यक्ष करण पवार या काका-पुतण्यांमध्ये आरोपप्रत्यारोप सुरू झाले आहेत. आम्ही कुणाच्या लाटेवर नाही तर कर्तृत्वावर निवडून आलो असल्याचे आमदार डॉ. पाटील यांनी म्हटले आहे तर काकासाहेब पारोळ्यातील आपली व पक्षाची पत ओळखा व नंतर गिरीश महाजन यांच्या विरूद्ध बोला असा टोला पवार यांनी डॉ.पाटील यांना मारला आहे.
गर्वाची भाषा करण्यापेक्षा लोकांची कामे करा - डॉ.पाटीलपक्षवाढीसाठी अन्य पक्षांवर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी टीका करणे ठिक मात्र इतर पक्षांना संपविण्याची भाषा ही गर्वाची आहे. आम्ही कोणत्याही लाटेवर विजयी झालो नाही तर कर्तृत्वावर निवडून आलो आहे, अशा शब्दात राष्ट्रवादी कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ.सतीश पाटील यांनी समाचार घेतला आहे. ते म्हणाले, अडीच वर्षात यांचे कर्तृत्व ते काय? गिरीश महाजन यांनी काय बोंब पाडली. माङया घरातील एका पोराला माङयाविरुद्ध बोलायला लावता हा केविलवाणा प्रकार आहे. आम्हाला संपविण्याची भाषा करत असाल तर पारोळ्यात येऊन निवडणूक लढवावी. गर्वाची भाषा करण्यापेक्षा लोकांची कामे करा, सिंचनाचे रखडलेले प्रकल्प पूर्ण करून पदाला न्याय द्या असे आव्हान डॉ. पाटील यांनी दिले आहे.
पारोळ्यातून लढायला आम्हीच कार्यकर्ते पुरे आहोत- पवारराष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष तथा आमचे काका डॉ. सतीश पाटील यांनी गिरीश महाजन यांच्या विरोधात बिनबुडाची टीका करण्यापेक्षा पारोळा शहरातील आपली व जिल्ह्यात पक्ष काय आहे हे तपासून पहावे असा टोला पारोळ्याचे नगराध्यक्ष करण पवार यांनी लगावला आहे. गिरीश महाजन यांनी 711 कोटींचे बलून बंधारे व सरकारी वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करून आणले. आपणही राज्यमंत्री होता त्यावेळी काय केले? महाजन यांनी जळगाव व नाशिकमध्ये जि.प.त यश मिळवून दाखविले. आपण मात्र पक्षाच्या चिन्हावर निवडणुका लढवू शकले नाही. पारोळ्यातून महाजन यांना उभे रहाण्याची गरज नाही आम्ही त्यांचे कार्यकर्तेच पुरे आहोत.