११ संचालक राजीनाम्याच्या तयारीत : मुंबईत पालकमंत्र्यांची भेट घेणार; सभापतींविरोधात नाराजी
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव - सहकारी संस्थांच्या निवडणुका लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. मात्र, त्याआधीच सहकारी संस्थांमध्ये राजकीय भूकंप घडत असून, ग.स. सोसायटीनंतर आता जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत आता सभापतींच्या कार्यपद्धतीवर नाराज होऊन तब्बल ११ संचालक राजीनामा देण्याचा तयारीत असून, बुधवारी रात्री काही संचालक मुंबईला जावून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेण्यासाठी रवाना झाले. गुरुवारी पालकमंत्र्यांची भेट घेऊन संचालक राजीनामा देण्यात येणार असल्याची माहिती बाजार समितीच्या काही संचालकांनी ‘लोकमत’ला दिली.
बाजार समितीचे सभापती कैलास चौधरी यांच्या कार्यपध्दतीवर काही संचालक नाराज होते. याबाबत पालकमंत्र्यांकडे देखील काही संचालकांनी तक्रारी केल्या होत्या. मात्र, आता लवकरच बाजार समितीच्या निवडणुका जाहीर होणार असून, त्या दृष्टीने बांधणी करण्यासाठी ही खेळी खेळली गेल्याचीही चर्चा आहे. दरम्यान, सभापतींविरोधात जिल्हा उपनिबंधकांकडे देखील तक्रार करण्यात येणार असल्याची माहिती काही संचालकांनी दिली आहे. राजीनाम्याच्या पत्रावर आतापर्यंत ११ संचालकांनी स्वाक्षरी केली असून, यामध्ये सुनील महाजन, लक्ष्मण पाटील, प्रभाकर पवार, पंकज पाटील, अनिल भोळे, भरत बोरसे, मुरलीधर पाटील, मच्छींद्र पाटील, सुरेश पाटील, प्रशांत पाटील, विमल भंगाळे यांचा समावेश आहे. तसेच सभापती कैलास चौधरी कोणालाही विश्वासात घेत नसल्याचाही आरोप या पत्रात करण्यात आला आहे. दरम्यान, याबाबत सभापती कैलास चौधरी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
कोट..
सभापती कैलास चौधरी मनमानी पध्दतीने आपला कारभार करत असून इतर संचालकांनी देखील ते विश्वासात घेत नव्हते. त्यामुळे संचालकांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे.
-प्रभाकर पवार, संचालक