जळगाव: जळगाव-औरंगाबाद महामार्ग चौपदरीकरण कामाच्या मंजुरीवरून श्रेयाचे राजकारण सुरू झाले असून दुपरीकरणाऐवजी उपलब्ध जागेतच चौपदरीकरण करण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाल्याची घोषणा मागील वर्षीच मुख्यमंत्र्यांनी केली असताना बुधवारी दिल्ली येथे केंद्रीय वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत बुधवार, ७ रोजी दुपारी झालेल्या बैठकीत याच कामाला मंजुरी मिळाल्याचा दावा आमदार खडसे गटाकडून करण्यात आला आहे.
जळगाव ते औरंगाबाद या मार्गावर प्रचंड वाहतूक आहे. राष्टÑीय महामार्ग विभागाने या मार्गावरील वाहतुकीचे सर्वेक्षण करून दिवसाला दहा हजार वाहने या मार्गावरून येत-जात असल्याचा अहवाल दिला होता. त्यातच हा मार्ग म्हणजे पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय प्रसिद्ध आहे. अजिंठा लेणी याच मार्गावर असल्याने देश-विदेशातील पर्यटकांची ये-जाही या मार्गावर मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळेच रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या कामास मंजूरी मिळावी यासाठी राजकीय नेते मंडळींकडूनही पाठपुरावा सुरू होता. केंद्रीय भुप्रुष्ट व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी जळगाव दौºयात या रस्त्याच्या चौपदरीकरणाची घोषणाही केली होती. या मार्गाच्या कामास जास्त खर्च येत असल्यामुळे चौपदरीकणाऐवजी दुहेरी करण करण्याची निविदा काढण्यात आली होती. त्यामुळे चौपदरीकरणाचा निर्णय केवळ घोषणाच ठरते की काय? असा संशय व्यक्त करण्यात आला होता. मात्र मागील वर्षीच दिल्ली येथील बैठकीतच हा विषय मार्गी लागला असून उपलब्ध जागेतच चौपदरीकरण करण्याचा निर्णय झाल्याचे टष्ट्वीट मुख्यमंत्र्यांनी केले होते. त्यानंतर या कामाला गती देखील आली आहे. मात्र बुधवारी झालेल्या बैठकीत माजी मंत्री खडसे यांनी जळगाव-औरंगाबाद महामार्गाचेही चौपदरीकरणच करण्याची मागणी लावून धरली. ती मान्य करीत या संपूर्ण मार्गाचे दुहेरीकरणाऐवजी चौपदरीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचा दावा खडसे गटाकडून करण्यात येत आहे. त्यामुळे या कामाच्या मंजुरीवरून भाजपातच श्रेयाचे राजकारण सुरू झाल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.