लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : महापौर व उपमहापौर पदासाठी १८ रोजी निवड प्रक्रिया पार पडणार आहे. मात्र त्याआधीच सत्ताधारी भाजपमधील इच्छुकांमध्येच वाद सुरू झाले आहेत. काही नगरसेवकांनी उपमहापौर पदासाठी इच्छुक असलेल्या नगरसेवकांच्या तक्रारी आता सुरू केल्या असल्याची माहिती भाजपच्या विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आता भाजप मध्येच अंतर्गत कुरघोडीचे राजकारण सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे.
महापौरपद हे ओबीसी महिला राखीव असल्याने अनेक इच्छुकांचा हिरमोड झाला. त्यामुळे इच्छुक नगरसेवकांनी आपला मोर्चा उपमहापौर पदाकडे वळवला आहे. काही इच्छुकांच्या तक्रारीच सत्ताधारी नगरसेवकांकडून करण्यात येत असल्याने अनेक इच्छुक या तक्रारीमुळे स्पर्धेत मागे पडत असल्याचेही चित्र पाहायला मिळत आहे.
कोणाला आंदोलन तर कोणाला शिक्षा भोवनार
उपमहापौरपदासाठी गटनेते भगत बालानी, डॉ. चंद्रशेखर पाटील, चेतन सनकत, धिरज सोनवणे, सुरेश सोनवणे यांची नावे चर्चेत सुरू आहे. तसेच विद्यमान उपमहापौर सुनील खडके यांनीही मुदतवाढीसाठी हालचाली सुरू केल्या आहेत. तसेच पक्षाने देखील त्यांना काही महिने मुदतवाढीचा शब्द दिला होता अशीही चर्चा सध्या भाजपमध्ये रंगली आहे. अशा परिस्थितीत इच्छुकांनी आपापल्या गटातील नगरसेवकांना घेऊन इतर इच्छुकांचा मार्ग काटण्यासाठी पक्षश्रेष्ठींकडे मागचे मुद्दे काढून तक्रारी सुरू केल्या आहेत. एका इच्छुकाने एन आर सी च्या मुद्द्यावरून झालेल्या आंदोलनात सहभाग घेतल्या वरून या नगरसेवकाला उपमहापौरपद देऊ नये अशीही मागणी काही नगरसेवकांनी पक्षश्रेष्ठींकडे केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर एक नगरसेवक घरकुल प्रकरणात आरोपी असल्याने त्यांना संधी दिल्यास पक्षाची हानी होईल अशीही तक्रार काही नगरसेवकांनी केली आहे. यामुळे पक्षश्रेष्ठींची डोकेदुखी वाढली आहे.
शिवसेना वेट अँड वॉच च्या भूमिकेत
महापौर व उपमहापौर पदासाठी भाजप मध्ये सुरू असलेल्या अंतर्गत वादामुळे शिवसेनेने अद्याप पर्यंत कोणतीही प्रतिक्रिया याबाबत गेलेली नाही. संपर्कप्रमुख संजय सावंत यांनी महापौरपदासाठी शिवसेना उमेदवार देणार असल्याचे सांगितले होते. मात्र अद्याप पर्यंत शिवसेनेने आपले पत्ते उघडले नाहीत. भाजपचा उमेदवार जाहीर झाला नंतरच शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर केला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान माजी मंत्री गिरीश महाजन हे शुक्रवारी शहरात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यावेळेस महाजन भाजपचा नगरसेवकांची चर्चा करू शकतात किंवा ही बैठक सोमवार पर्यंत देखील लांबण्याची शक्यता आहे.