ऑनलाईन लोकमत
धुळे, दि. 31 - जिल्ह्यातील 108 ग्रामपंचायतींची मुदत नोव्हेंबर-डिसेंबर 2017 मध्ये संपणार आहे. त्या पाश्र्वभूमीवर जिल्हा प्रशासनातर्फे या सर्व ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची तयारी सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार या ग्रा.पं. निवडणुकीत थेट जनतेतून सरपंचपदाची निवड होणार असल्याने ग्रामीण भागात राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. तसेच इच्छुक उमेदवार आतापासूनच बेरजेचे गणित जुळवताना दिसत आहेत. धुळे जिल्ह्यात नोव्हेंबर 2017 मध्ये जिल्ह्यातील 83, तर डिसेंबर महिन्यात 25 ग्रामपंचायतींची मुदत संपत आहे. त्या पाश्र्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयातील ग्रामपंचायत शाखेने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. धुळे तालुक्यातील सर्वाधिक 35 ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. 1 सप्टेंबरला होणार अंतिम मतदार यादी प्रसिद्ध दरम्यान, जिल्ह्यातील सर्व 108 ग्रामपंचायतींची मतदारांची यादी अपडेट करण्यात आली आहे. त्यानुसार मतदारांना 31 ऑगस्टर्पयत मतदार यादींवर हरकती घेण्यासाठी गुरुवारी दुपार्पयत अंतिम मुदत देण्यात आली असून, आतार्पयत एकही हरकत प्राप्त झाली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मतदार यादींवर हरकत प्राप्त न झाल्यास 1 सप्टेंबरला ग्रामपंचायतनिहाय मतदारांची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार असल्याची माहिती ग्रामपंचायत शाखेतर्फे देण्यात आली आहे.जिल्ह्यातील 25 ग्रामपंचायतींची मुदत जरी डिसेंबर महिन्यात संपत असली तरी त्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका या नोव्हेंबर महिन्यातच घ्याव्यात, अशी सूचना राज्य निवडणूक आयोगातर्फे देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 108 ग्रामपंचायतींसाठी मतदान प्रक्रिया घेण्यासाठी सप्टेंबरच्या पहिल्या आठवडय़ात निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात येणार आहे. तत्पूर्वी, तेथील मतदारांची अंतिम यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यानंतर ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार असल्याची माहिती ग्रामपंचायत शाखेने दिली आहे.शिंदखेडा नगरपंचायतसाठी मतदान प्रक्रिया डिसेंबर 2017 ते जानेवारी 2018 या कालावधीत घेण्यात येणार आहे. त्या पाश्र्वभूमीवर अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्यात आली असून मतदारांच्या याद्या अपडेट करण्याचे काम सुरू आहे. मतदार यादीतील दुबार नावांचा शोध घेऊन दुबार नावांची वगळणीही केली जात आहे.