लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : राज्यासह जिल्ह्यात हळूहळू पुन्हा कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे़ त्यामुळे पुन्हा कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता असल्याने गोरगरिब शिधापत्रिकाधारकांना मार्चपर्यंत मोफत धान्य वाटप करण्यात यावे, अशा मागणीसाठी सोमवारी दुपारी बारा वाजता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) तर्फे जोरदार निदर्शने करण्यात आली. कोरोना महामारीत गोरगरिबांना मोफत धान्य मिळालेच पाहिजे. रिपाइंचा विजय असो, अशा आंदोलकर्त्यांच्या घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून गेला होता.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले गट) महानगर अध्यक्ष अनिल अडकमोल यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली. अर्धा ते पाऊण तास निदर्शने सुरू होती. त्यानंतर जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले़ निवेदनात म्हटले की, कोरोनामुळे लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर गोरगरिबांवर उपासमारीची वेळ येऊ नये म्हणून केंद्र सरकारने प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना, प्रधानमंत्री आत्मनिर्भर योजना या अंतर्गत शिधापत्रिका लाभार्थ्यांना प्रती व्यक्ती पाच किलो गहू व तांदूळ तसेच १ किलो डाळ असे स्वस्त धान्य दुकानामार्फत दिले होते. त्यामुळे गोरगरिबांना चांगल्या प्रमाणात फायदा झाला. आता दुसरी लाट येण्याची शक्यता असून, कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. त्यामुळे लॉकडाऊन होऊ शकते. म्हणून मार्चपर्यंत गोरगरिबांना मोफत धान्य वाटप करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. ऑक्टोबर महिन्यापासून जिल्ह्यात गव्हाचे प्रमाण कमी करून मका देण्याचे प्रमाण वाढले आहे़, त्यामुळे मकाऐवजी ज्वारी द्यावी, अशीही मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
निदर्शनात यांचा होता सहभाग
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आलेल्या निदर्शनात गोविंदा सोनवणे, प्रताप बनसोडे, ईश्वर पवार, मानव गायकवाड, किशोर तायडे, शेखर सोनवणे, किरण अडकमोल, शैलेश जाधव, बापू धामणे, विनोद साळवे, हरीश शिंदे, रोहित गायकवाड, भैया सपकाळे, शंकर आराक, ज्ञानेश्वर अहिरे, अक्षय बोदडे, अबु शेख तडवी, बंटी सपकाळे, राहुल अहिरे, मोहन आढांगे, राजू सोनवणे, सुनील सपकाळे, प्रकाश चौधरी आदींचा सहभाग होता.