जळगाव : शिधा पत्रिका धारकांना धान्य मिळत नसल्यास अथवा इतर कारणांनी आता शिधा पत्रिका धारकांना दुकाने बदलण्याचा (पोर्टेबिलिटी) पर्याय उपलब्ध झाला आहे. जळगाव जिल्ह्यात नोव्हेंबर महिन्यात १८ हजार २७ शिधापत्रिका धारकांनी पोर्टेबिलिटीचा लाभ घेतला आहे.
शिधा पत्रिका धारकांना धान्य न देणे, धान्य आले असताना धान्य नसल्याचे सांगणे, फलक न लावणे, ठरवून दिलेल्या दुकानांविषयीचे पालन न करता घरामध्ये दुकाने चालविणे अशा वेगवेगळ्या तक्रारी शिधापत्रिका धारकांच्या असतात. यात कोरोना काळात तर सोशल डिस्टंन्सिंगचे पालन न करणे, मास्कचा वापर न करणे असे प्रकारदेखील मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात आढळून आले. त्यामुळे अशा दुकानांवर जिल्हा पुरवठा विभागाच्यावतीने कारवाई करण्यात आली. स्वस्त धान्य दुकानांविषयी तक्रारी वाढत असल्याने पोर्टेबिलिटीचा पर्याय उपलब्ध करण्यात आला आहे. १८ हजार २७ शिधापत्रिका धारकांनी पोर्टेबिलिटीचा लाभ घेतला आहे.
या आहेत तक्रारी
शिधा पत्रिका धारकांना धान्य न देणे, धान्य आले असताना धान्य नसल्याचे सांगणे, फलक न लावणे, ठरवून दिलेल्या दुकानांविषयीचे पालन न करता घरामध्ये दुकाने चालविणे अशा वेगवेगळ्या कारणांमुळे जिल्ह्यात कारवाई केली गेली. यामुळे ग्राहकांना दुकाने बदलता येत आहे. तसेच काही जणस्थलांतरीत झाल्यानेही दुकाने बदलली.
दोन दुकानांवर कारवाई
ग्राहकांच्या वेगवेगळ्या तक्रारींवरून नोव्हेंबर जिल्ह्यातील दोन स्वस्त धान्य दुकानांचा परवाना निलंबित करण्यात आला. यामध्ये मुक्ताईनगर तालुक्यातील चिखली व भुसावळ शहरातील एका दुकानाचा समावेश आहे. तसेच जळगाव शहरातील १५ दुकानांची अनामत रक्कम जप्त करण्यात आली. जिल्ह्यात एकूण ४९ हजाराचा दंड करण्यात आला.
एकूण रेशनकार्डधारक - १००३२४९
पोर्टेबिलिटीचा लाभ घेतलेले - १८०२७
—————————
शिधा पत्रिका धारकांना धान्य न देणे, धान्य आले असताना धान्य नसल्याचे सांगणे, फलक न लावणे अशा वेगवेगळ्या तक्रारी शिधापत्रिका धारकांच्या असतात. यात नोव्हेंबर महिन्यात दोन दुकानांचे परवाने निबंबित केले आहे.
- सुनील सूर्यवंशी, जिल्हा पुरवठा अधिकारी