लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रमांतर्गत एक पथक जिल्हाभरातील कोविड सेंटरला जावून बाधित रुग्णांचे समुपदेशन करत असून, त्यांना सकारात्मक दृष्टीकोन देऊन रुग्णांच्या मनातील भीती घालविण्याचे काम या पथकामार्फत पहिल्या लाटेपासून केले जात आहे. मन शांत ठेवले तर तुम्ही कशावरही मात करू शकता, असा सल्ला पथकामार्फत दिला जात आहे.
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली हे पथक कार्यरत आहे. जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग प्रचंड वाढत असून, मृत्यूदरही वाढला आहे. मात्र, यात कोरोनाच्या भीतीमुळे रुग्णांना धोका पाेहोचत असल्याचे समोर आल्यामुळे रुग्णांचे मानसिक आरोग्य नियंत्रित राहावे यासाठी या पथकामार्फत कोविड सेंटरला जावून रुग्णांशी संवाद साधला जातो. या पथकात मानससोपचार तज्ज्ञ डॉ. कांचन नारखडे या कार्यक्रम अधिकारी असून, त्यांच्यासह चिकित्सक मानसतज्ज्ञ दौलत निमसे, मनोसामाजिक कार्यकर्त्या ज्योती पाटील, मनोविकृती परिचारक विनोद गडकर, रेकॉर्ड किपर मिलिंद बऱ्हाटे, चंद्रकांत ठाकरू हे या पथकात कार्यरत आहेत.
मानसिकता कशी होते खराब
कोविडची लागण झाल्यानंतर रुग्णाला धक्का बसतो, यात आयसोलेशन अर्थात एकटेपणाची भावना भीतीदायक वाटते. कानावर येणाऱ्या मृत्यूच्या बातम्यांमुळे मनोबल खचते. मात्र, अशास्थितीत रुग्णांशी कोणी संवाद साधला, त्यांचे विचार कोणीतरी ऐकून घेतेय, त्यांना कोणीतरी समजून सकारात्मक वाट दाखवतेय, याची जेव्हा त्यांना जाणीव होते, तेव्हा त्यांची भीती दूर होते. त्यामुळे रुग्णांशी संवाद साधून त्यांना सकारात्मक दृष्टीकोन आम्ही देत असतो, असे डॉ. नारखेडे यांनी सांगितले.
फोनवर रोज शंभर रुग्णांचे समुपदेशन
प्रत्येक कोविड केअर सेंटरला जाणे जरी शक्य नसले, तरी एका टोल फ्री क्रमांकावर या पथकाद्वारे रुग्णांच्या मानसिक समस्या दूर केल्या जातात. यात किमान शंभर ते दीडशे रुग्णांचे फोनवर समुपदेशन केल जाते. यातील बहुतांश कॉल हे भीती, नैराश्य या संदर्भातील असतात, असे डॉ. कांचन नारखडे यांनी सांगितले.
काय होताहेत सकारात्मक परिणाम
रुग्ण नैराश्यातून बाहेर पडतात.
त्यांची ऊर्जा वाढून त्यांना एक आत्मविश्वास येतो.
रुग्णांच्या मनातून भीती निघून जावून ते सकारात्मकतेने आजाराचा सामना करतात व बरे होतात.
रुग्णांचे मनोबल वाढते.
भीतीने शरीर प्रतिकारशक्तीवर केंद्रीत होऊ शकत नाही
कोरोनाशी लढण्यात तुमच्या प्रतिकारशक्तीची महत्त्वाची भूमिका असते. अशास्थितीत जर मन शांत असेल तर शरीर प्रतिकारशक्ती वाढविण्यावर लक्ष केंद्रीत करू शकते, मात्र आधीच डोक्यात नकारात्मक विचार, भीती असेल तर शरीर त्यावर लक्ष केंद्रीत करू शकत नाही. यासाठी साधे उदाहरण म्हणजे आपल्या डोक्यात काही विचारांचा काहूर असेल तर कुठल्याच कामात लक्ष लागत नाही, तसेच हे आहे. त्यामुळे भीती न बाळगता जेवढे तुम्ही स्टेबल राहाल, तेवढे शरीर चांगला प्रतिसाद देईल, असे डॉ. कांचन नारखेडे यांनी सांगितले.