जळगाव : छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती दरवर्षाप्रमाणे साजरी करण्याविषयी दोन दिवसात सरकारचा सकारात्मक निर्णय होऊ शकतो, असा विश्वास शिवप्रेमींकडून व्यक्त केला जात आहे. बाजारपेठेतील गर्दी असो अथवा इतर सभादेखील होऊ लागल्याने शिवजयंतीला काय अडचण असा सवालदेखील उपस्थित केला जात आहे. दरम्यान, शिवजयंती नेहमीप्रमाणे साजरी करण्याची मागणीदेखील जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली आहे. यात राज्य सरकारने दिलेल्या निर्देशानुसार साधेपणाने शिवजयंती साजरी होणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. मात्र कोरोनाच्या संसर्गामुळे मिरवणुका व इतर उत्सवांवर बंधने आली. त्यानंतर हळूहळू अनलॉक होत गेले व बहुतांश कार्यक्रम साजरे होऊ लागले. मात्र छत्रपती शिवाजी महाराज जयंतीसंदर्भात राज्य सरकारने आदेश देत साधेपणाने साजरी करण्याचे निर्देश दिले. मात्र शिवजयंती साजरी करण्याविषयी अनेक संघटनांनी राज्य सरकारने मागणी केली आहे. अशाच प्रकारे जिल्हा प्रशासनाकडेदेखील संभाजी ब्रिगेडतर्फे मागणी करण्यात आली आहे.
सभा होतात, मग शिवजयंतीला परवानगी का नाही?
कोरोनाच्या सावटात अनलॉक होत असताना सभा, बैठका होऊ लागल्या आहेत. बाजारपेठेत मोठी गर्दी होत आहे. असे असताना शिवजयंतीलाच परवानगी का नाही, असा सवाल विविध संघटनांकडून उपस्थित केला जात आहे. राज्य सरकार व जिल्हा प्रशासनाकडे मागणी केली असून दोन दिवसात सकारात्मक निर्णय होईल, असा विश्वासही संघटनांकडून व्यक्त केला जात आहे.
—————
शिवजयंती संदर्भात राज्य सरकारने निर्देश दिलेले असून त्या पद्धतीने जिल्ह्यात शिवजयंती साजरी होईल.
- अभिजित राऊत, जिल्हाधिकारी.
शिवजयंती साजरी करण्यासंदर्भात विविध संघटनांनी राज्य सरकार, जिल्हा प्रशासनाकडे मागणी केली आहे. आता सर्व सभा होऊ लागल्या आहे, इतर कार्यक्रम होत आहे. शिवजयंतीलाही परवानगी मिळावी, अशी अपेक्षा आहे. दोन दिवसात सकारात्मक निर्णय होऊ शकतो.
- सुरेंद्र पाटील, मराठा सेवा संघ