भुसावळ, जि.जळगाव : मनुष्य जीवनात दररोज ताण-तणाव, चिंता, भीती कोणत्या ना कोणत्या विषयानिमित्त येत असतात. मेंदूत हजारो विचार, भावना व चिंता असतात. त्याचा परिणाम शरीरावर होऊन अनेक व्याधी जडतात. यासाठी मेंदूला काय आवडते यापेक्षा आवश्यक काय आहे हे जाणून घेऊन आनंददायी जीवनासाठी संगीताचा सकारात्मक आहार त्याला दिल्यास आपले जीवन आनंदी झाल्याशिवाय राहणार नाही, असे प्रतिपादन म्युझिक थेरपिस्ट डॉ.संतोष बोराडे यांनी येथे केले.येथील ज्ञानासह मनोरंजन ग्रुपतर्फे आयोजित जीवन संगीत कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रा.डॉ.शुभांगी राठी, तर प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याध्यापिका हेमांगिनी चौधरी होत्या.जीवन संगीत या विषयावर बोलताना डॉ.बोराडे म्हणाले की, शरीर सुस्थितीत राहायचे असेल तर मेंदू सुस्थितीत राहायला हवा. आपण छोट्या छोट्या गोष्टीतून भिंती तयार करून मानसिक तणाव निर्माण करतो. मेंदूच्या आजाराची जबाबदारी आपण दुसऱ्यावर सोपवतो. त्यासाठी मेंदूला नियमित आहार, व्यायाम व औषधाची गरज आहे. मनोकायिक आजार दूर करण्यासाठी संगीत हा महत्वपूर्ण आहार, व्यायाम व औषधदेखील आहे. जोपर्यंत आपण स्वत: आनंद निर्माण करत नाही तोपर्यंत आपल्याला कोणीच बरे करू शकत नाही. आपण इमर्जन्सीपेक्षा नॉर्मल सिस्टीममध्ये जीवन जगणे शिकले पाहिजे. त्यासाठी जीवनाला संगीताची जोड द्यावी, असेही त्यांनी सांगितले.तब्बल दोन तास चाललेल्या या व्याख्यानात डॉ.बोराडे यांनी विविध जुन्या व नव्या गाण्यांचा संगम साधून उपस्थित श्रोत्यांना मनोरंजनासह संगीत ज्ञानाची अनुभूती करून दिली.प्रारंभी सरस्वती पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. डॉ.राठी यांनी अध्यक्षीय मनोगतात संगीतमय व्याख्यान आपल्यासाठी किती महत्त्वाचे आहे याविषयी सांगितले.प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा.दिलीप ललवाणी यांनी, परिचय सुनील वानखेडे यांनी करून दिला. आभार ग्रुपप्रमुख डॉ.जगदीश पाटील यांनी मानले.
आनंददायी जीवनासाठी मेंदूला हवा संगीताचा सकारात्मक डायट : डॉ.संतोष बोराडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2020 3:45 PM
मेंदूला काय आवडते यापेक्षा आवश्यक काय आहे हे जाणून घेऊन आनंददायी जीवनासाठी संगीताचा सकारात्मक आहार त्याला दिल्यास आपले जीवन आनंदी झाल्याशिवाय राहणार नाही, असे प्रतिपादन म्युझिक थेरपिस्ट डॉ.संतोष बोराडे यांनी येथे केले.
ठळक मुद्दे श्रोत्यांना मिळाली मनोरंजनासह संगीत ज्ञानाची अनुभूतीमेंदूला काय आवडते यापेक्षा आवश्यक काय आहे हे जाणून घ्या