शरदकुमार बन्सीधरणगाव : गेल्या पाच वर्षांपासून पहाटे नियमित योगा केल्यामुळे ताणतणावातून मुक्ती मिळून शारीरिक -मानसिक स्वास्थासह दिवसभर व्यवसायामध्ये सकारात्मक उर्जा मिळत असल्याचा अनुभव येथील व्यापारी ज्ञानेश्वर चौधरी यांनी व्यक्त केला.येथील छत्रपती शिवाजी व्यापारी संकुलात मोबाईल विक्री व दुरुस्तीचा ज्ञानेश्वर चौधरी यांचा व्यवसाय असून दिवसभर ग्राहकांशी तोंड देत पूर्वी येणारा थकवा आता गेल्या पाच-सहा वर्षांपासून योगा केल्यामुळे येत नसल्याचे त्यांचे मत आहे.त्यांनी सांगितले की, आम्ही चार- पाच व्यवसाय बंधू नियमित योगवर्गास जातो. योगशिक्षक हभप सी.एस. पाटील हे आम्हाला नि:शुल्क मार्गदर्शन करतात. योगामुळे ताणतणावातून मुक्ती मिळाली. तसेच शारीरिक व मानसिक आरोग्य लाभले. कामाच्या ठिकाणी दिवसभर सकारात्मक उर्जा मिळत आहे. ओंकारनाद, प्रार्थना, सूर्यनमस्कार, योगासने, प्राणायाम, ध्यान असा दीड तासांचा दररोजचा योगवर्ग असतो. हा दीड तास योगासाठी म्हणजे स्वत:साठी दिला. योगामुळे उत्तम आरोग्य लाभते, हा माझा अनुभव आहे असे चौधरी यांनी सांगितले.
नियमित योगामुळे सकारात्मक ऊर्जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2019 2:43 PM