लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : विठ्ठलपेठेतील एका कुटुंबाने शासकीय यंत्रणेत कोरोनाची तपासणी केल्यानंतर आरटीपीसीआर अहवालात चारही लोक बाधित आढळून आले, मात्र, त्यांनी खासगी तपासणी केल्यानंतर त्यांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने गोंधळ उडाला आहे. आता या कुटुंबीयांना रुग्णालयात दाखल कसे करावे, याबाबत महापालिकेची यंत्रणा विचारात आहे.
शहरातील सर्वच भागात रुग्ण समोर येत असल्याचे गंभीर चित्र निर्माण झाले आहे. कुटुंबच्या कुटुंब बाधित येण्याचे प्रमाण अधिक झाले आहे. दरम्यान, विठ्ठलपेठेतील या कुटुंबीयांचा महापालिका यंत्रणेशी वाद झाल्याचीही माहिती आहे. पॉझिटिव्ह-निगेटिव्हच्या या वादात यंत्रणेची मात्र, डोकेदुखी वाढणार आहे. दरम्यान, शहरातील रामानंद नगर, देवेंद्र नगर या भागात प्रत्येकी तीन रुग्ण आढळून आले असून यासह विवेकानंद प्रतिष्ठान, चित्रा चौक, मेहरूण, गणेशवाडी, रामेश्वर कॉलनी, नाथवाडा, जुनी जोशी कॉलनी, माधवनगर, अर्जुन नगर, मुंदडा, खोटे नगर, व्यंकटेश नगर, पोस्टल कॉलनी, गणपती नगर, आदर्श नगर, विठ्ठल पेठ, महाबळ, शाहू नगर, ओम साईराम नगर, मुक्ताईनगर, अरिहंत कॉलनी, प्रोफेसर कॉलनी या भागात प्रत्येकी १ रुग्ण बाधित आढळून आला आहे.