विनायक वाडेकर
मुक्ताईनगर, जि.जळगाव : बांधकामावर २०० रुपये रोजाने काम करणाऱ्या मजूर तरुणाने समाजापुढे एक आदर्श ठेवला आहे. आपल्या लग्नासाठी कुठलेही आयोजन न करता संतोष त्र्यंबक कांडेलकर (२३, रा. कोऱ्हाळा, ता. मुक्ताईनगर) याने अनाथ, गरीब व होतकरू मुलांसाठी काम करणाऱ्या विश्वदीप फाउंडेशनला ५५ हजार ५५५ रुपयांची मदत दिली आहे.या रकमेचा धनादेश नुकताच संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आला. संतोष याचा विवाह शनिवार, ८ रोजी अतिशय साध्या पद्धतीने कोऱ्हाळा येथे झाला.
संतोष कांडेलकर हा स्वतः भूमिहीन आहे. वडील त्र्यंबक कांडेलकर व आई सुनंदाबाई कांडेलकर यांचे निधन झाले आहे. संतोष व त्याचा भाऊ सुरेश हे जेजुरी येथे सेंट्रिंगचे काम करतात. तिथे त्यांना दोनशे रुपये रोज मिळतो. त्यावर ते आपला उदरनिर्वाह भागवितात. आपल्या कमाईचा काही हिस्सा तेआईच्या नावाने सुरू केलेल्या वाचनालयाला आणि विश्वदीप फाउंडेशनच्या सामाजिक उपक्रमाला दान करतात. या निधीतून विश्वदीप फाउंडेशनने दोन मुली दत्तक घेण्याची योजना प्रहार संघटनेच्या माध्यमातून आखली आहे.
संतोष याचे शिक्षण मुक्त विद्यापीठातून पदवीपर्यंत झाले आहे. पत्नी ममता कोळी ही मुक्ताईनगर येथील आहे. दोन वर्षांपूर्वी त्याने आई सुनंदाबाई कांडेलकर यांच्या नावाने वाचनालय सुरू केले आणि त्यात अनेक पुस्तकेही पुण्याहून आणली होती. विशेष म्हणजे लग्नात आलेल्या अहेराची २२ हजार रुपयांची रक्कमदेखील त्यांनी विश्वदीप फाउंडेशनला भेट दिली आहे.मदतीचा हा धनादेश अनिल दौलत कान्हे, ईश्वर कोळी, डॉ. विवेक सोनवणे, विष्णू झाल्टे, विशाल झाल्टे, अमोल न्हावकर, उमेश कांडेलकर, प्रमोद पोहेकर या सामाजिक आणि प्रहार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आला. याप्रसंगी विश्वदीप फाउंडेशनच्या संचालक ममता संतोष कोळी (कोऱ्हाळा), अजिंक्य इंगळे (सोयगाव), शारदा साळुंखे (पुणे), जितेंद्र गवळी (पाल, ता.रावेर), मनीष बोरोकार (बुलडाणा) आणि सतीश वानखेडे (कोऱ्हाळा) आदी उपस्थित होते.
स्वत:मध्ये गुंतलेल्या तरुणाईने समाजातील वास्तव जाणून घ्यावे. आपल्या वाढदिवसानिमित्त का होईना एक दिवस गरजू व निराधारांसोबत घालवावा. या जाणीव जागृतीमधून तरुणांनी साध्या पद्धतीने लग्न करून विधायक कार्यासाठी पुढाकार घ्यावा.- संतोष कांडेलकर.