ठळक मुद्दे पोलिसांच्या व सामाजिक कार्यकर्त्यांच्या मध्यस्थीने वाद मिटला आठव्या इयत्तेपासून हा प्रकार सुरू
अमळनेर : शहरातील रफू चक्कर झालेले दोन प्रेमीयुगुल आणि रफू चक्कर होणारे दोन असे चार प्रेमीयुगुल यांना पोलीस व सामाजिक कार्यकर्त्यांच्या मध्यस्थीने घरी आई-वडिलांच्या ताब्यात देऊन त्यांचे मन परिवर्तन केल्याने मोठा तणाव होण्यापासून बचावला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. चाळीसगावचे अपर पोलीस अधीक्षक सचिन गोरे यांनी शनिवारी अमळनेर पोलीस स्टेशनला पत्रकार परिषद आयोजित केली होती यावेळी डीवायएसपी राकेश जाधव आणि पोलीस निरीक्षक अंबादास मोरे हजर होते. शहरातील दोन प्रतिष्ठित व्यक्तींच्या दोन मुली एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकत होत्या. त्यांचे वर्गातील एकाशी व त्याच्या मित्राशी प्रेम जमले होते. आठव्या इयत्तेपासून हा प्रकार सुरू होता. मुले १९ वर्षांची झाल्यावर त्यांनी विवाह करण्याचा निर्णय घेतला होता. पालकांना ही माहिती मिळाली होती. ‘लवजिहाद’सारखा प्रकार असल्याचे वातावरण तयार झाले. मुलाचे वय २१ नसल्याने ते बेकायदेशीर होते. पोलीस व सामाजिक कार्यकर्त्यांच्या मध्यस्थीने मुलींचे मन परिवर्तन करून मुलांना त्यांच्या संभाव्य धोक्याची व कायद्याची जाणीव करून देण्यात आली. त्यामुळे मुले-मुली आपल्या पालकांच्या ताब्यात जाऊन त्यांनी निर्णय बदलल्याने तणाव होण्यापासून वाचला. त्याचप्रमाणे पिंपळे रोडवरील एक तरुणी दीपाली (नाव बदलले आहे) २३ रोजी रात्री आठच्या सुमारास आपला मित्र राहुलसोबत (नाव बदलले आहे) घरातून २७ हजार रुपये रोख व सोन्याची पाच ग्राम अंगठी घेऊन निघून गेली होती. पालकांनी पोलिसात तक्रार दिल्यानंतर पो.नि.मोरे यांनी स्थानिक गुन्हा शाखेचे नरेंद्र वारुळे यांची तांत्रिक मदत घेऊन सुनील हटकर याना प्रेमी युगुलाचा शोध घेण्यास सांगितले. दोघांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांची समजूत घालून मन परिवर्तन केले आणि पालकांच्या ताब्यात देऊन मुलाचा पुण्याचा मित्र राकेश पाटीलकडून रोख रक्कम व सोन्याची अंगठी मुलीच्या पालकांच्या स्वाधीन केली. याशिवाय चौथी घटना अशी होती की, एका मुलीला घेऊन एक मुलगा पळवून घेऊन गेला होता .ही माहिती पसरताच शहरात दोन समाजात तेढ निर्माण होण्याची शक्यता असल्याने गोपनीय अंमलदार शरद पाटील यांना कळल्यावर त्यांनी पो.नि.मोरे याना सांगितले. त्यांनी सत्तार तेली, सईद तेली, अब्दुल हमीद शेख, आमिर खाटीक संतोष लोहरे, नितीन लोहरे या दोन्ही समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींची मदत घेऊन प्रेमीयुगुलाला जळगाव येथून परत आणून त्यांना होणाऱ्या परिणामाची जाणीव करून दिली. त्यामुळे या दोन समाजातील तणाव निवळून मुलगा, मुलगी पालकांच्या ताब्यात देण्यात आले. शहरातील चारही घटनांमुळे पालक सुखावले आहेत.अल्पवयात मुले बिघडणे घातक आहे. पालकांनी आणि शाळाचालकांनी मुलांकडे बारकाईने लक्ष द्यावे. त्यांचे मोबाईल, मित्र, मैत्रिणी याची माहिती ठेवून संवाद साधावा.-सचिन गोरे, अपर पोलीस अधीक्षक, चाळीसगावअमळनेरातून रफू चक्कर होणारे चार प्रेमीयुगुल पालकांच्या ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2021 9:37 PM