जळगाव, दि.6- जिल्हा परिषदेत येत्या 18, 19 व 20 एप्रिल रोजी येण्यासंबंधी नियोजन झालेला पंचायत राज कमिटीचा (पीआरसी) दौरा स्थगीत होण्याची शक्यता आहे. यासंदर्भात जि.प.मध्ये अधिकारी वर्गात दिवसभर चर्चा होती. जि.प.मध्ये येत्या 18 रोजी सर्वसाधारण सभा आहे. त्यात दोन सभापतींच्या समित्यांच्या निश्चितीसह सर्व सदस्यांना विविध समित्यांमध्ये नियुक्ती दिली जाईल. दिवसभर ही प्रक्रिया चालणार असून, त्यासाठी जि.प.तील सर्व वरिष्ठ अधिकारी, सदस्य यांची उपस्थिती अत्यावश्यक आहे. अधिकारी म्हणजेच पूर्ण प्रशासन सर्वसाधारण सभेत व्यस्त राहील. अशात 18 रोजीच पीआरसीचा दौरा नियोजीत आहे. एकाच वेळी सभा व पीआरसीसंबंधी कार्यवाही करणे शक्य नसल्याने पीआरसीचा दौरा स्थगीत होण्याची शक्यता आहे. कमिटीच्या दौ:याच्या तारखांमध्ये एक किंवा दोन दिवसांचा बदल करून नंतर ही कमिटी जि.प.मध्ये येईल, असे संकेत आहेत. यासंदर्भात जि.प.कडे मात्र कुठलेही अधिकृत पत्र, सूचना नसल्याची माहिती मिळाली.
जळगाव जि.प.त पीआरसीचा दौरा स्थगित होण्याची शक्यता
By admin | Published: April 06, 2017 1:22 PM