लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाच्या द्वितीय सत्राच्या उन्हाळी परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या वतीने नुकतेच जाहीर करण्यात आले आहे.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षा प्रारंभ झाल्या आहेत तर काही अभ्यासक्रमांच्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक विद्यापीठाकडून जाहीर करण्यात आलेले आहे. अशातच प्रथम वर्ष विज्ञान व एमएसस्सी वर्ग तसेच कला, वाणिज्य व व्यवस्थापन अभ्यासक्रमांच्या पदवी व पदव्युत्तर वर्गाच्या प्रथम वर्षाच्या द्वितीय उन्हाळी लेखी व अंतर्गत / बहिस्थ प्रात्यक्षिक परीक्षा, प्रकल्प, मौखिक परीक्षा सुरू होण्याच्या संभाव्य विद्यापीठाकडून जाहीर करण्यात आलेल्या आहेत.
असे आहे वेळापत्रक
विज्ञान प्रथम वर्षाच्या द्वितीय सत्राची परीक्षा ८ जुलै ते २० जुलै कालावधीत होईल. १ ऑगस्ट ही लेखी परीक्षेची संभाव्य तारीख आहे. एमएसस्सी द्वितीय सत्राची प्रात्यक्षिक परीक्षा १० ऑगस्ट ते २० ऑगस्ट या कालावधीत होईल. तर २५ ऑगस्ट ही लेखी परीक्षेची संभाव्य तारीख असेल. प्रथम वर्ष पदवी व पदव्युत्तर कला, वाणिज्य व व्यवस्थापन अभ्यासक्रमाची प्रात्यक्षिक परीक्षा ही महाविद्यालयांच्या निश्चित केलेल्या वेळापत्रकानुसार होईल. पण, पदवी कला, वाणिज्य व व्यवस्थापनाची लेखी परीक्षा १ ऑगस्ट तर पदव्युत्तरची २५ ऑगस्टपासून लेखी परीक्षा सुरू होण्याची संभाव्य तारीख जाहीर करण्यात आली आहे. त्याचबरोबर प्रथम वर्ष एमबीए सत्र २ ची लेखी परीक्षा १५ सप्टेंबर रोजी होईल.