जळगाव : पोस्टाच्या कामासंबधी ज्या तक्रारींचे सहा आठवड्यात निराकरण झाले नसले असा तक्रारींच्या निराकरणासाठी महाराष्ट्र सर्कलचे पोस्टमास्तर जनरल यांनी २६ जून रोजी सकाळी ११ वाजता मुंबई येथे डाक अदालतीचे आयोजन केले आहे. ज्यांच्या तक्रारींचे सहा आठवड्यात निराकरण झालेले नाही, त्यांनी या अदालतीत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
जप्त केलेल्या वाहनांचा २४ रोजी लिलाव
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : राज्य उत्पादन शुल्क विभागाने जप्त केलेल्या ट्रक, मोटारसायकल तसेच इतर मुद्देमालाचा जाहीर लिलाव २४ जून रोजी सकाळी ११ वाजता केला जाणार आहे. त्यात सहभागी होण्यासाठी अटी, शर्तींची माहिती घेण्यासाठी अधीक्षक,राज्य उत्पादन शुल्क कार्यालय, जळगाव येथे संपर्क साधावा, असे आवाहन विभागाच्या अधीक्षक सीमा झावरे यांनी केले आहे.
तुरीच्या वाणाच्या मिनीकिटीसाठी अर्ज करण्याचे आवाहन
जळगाव : तूर पिकाच्या राजेश्वरी वाणाच्या मिनीकिटसाठी जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या ईमेलवर १० जून पर्यंत संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांनी केले आहे. तूर पिकाच्या या वाणाचा १४ क्विंटल पुरवठा जिल्ह्याला होणार आहे.
डी-मार्ट रस्त्याचे काम पूर्ण करण्याची मागणी
जळगाव : गेल्या काही वर्षांपासून इच्छादेवी चौक ते डी-मार्ट रस्त्याचे काम अपूर्ण असल्यामुळे वाहनधारकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. परिणामी यामुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. तसेच अपघात घडण्याचीही शक्यता निर्माण झाली आहे. मनपा प्रशासनाला अनेकवेळा निवेदन देऊनही या रस्त्याची दुरुस्ती झालेली नाही. तरी जिल्हाधिकारी या नात्याने याकडे लक्ष देऊन तातडीने या रस्त्याचे अपूर्ण काम पूर्ण करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते वासुदेव कुकरेजा यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केलेली आहे.
हुडको परिसरात मनपातर्फे बसविले नवीन पथदिवे
जळगाव : शिवाजी नगरातील हुडको परिसरात मनपातर्फे बुधवारी नवीन पथदिवे बसविण्यात आले आहेत. तसेच या ठिकाणच्या सार्वजनिक स्वच्छतागृहाच्या परिसरातही पथदिवे बसविण्यात आले. यावेळी नगरसेवक नवनाथ दारकुंडे उपस्थित होते.
शिवसेना वैद्यकीय मदत कक्षातर्फे सॅनिटाइजर वाटप
जळगाव : शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व रेडप्लस ब्लड बँक यांच्यावतीने नुकतेच पोलीस अधीक्षक कार्यालय, रेल्वे पोलीस स्टेशन, रुग्णवाहिकेवरील चालक, शासकीय महिला रुग्णालय, जिल्हा वैद्यकीय व चौका-चौकात बंदोबस्तावर असलेल्या वाहतूक शाखेच्या पोलिसांना सॅनिटाइजर वाटप करण्यात आले. यावेळी वैद्यकीय मदत कक्षाचे जळगाव शहर समन्वयक जितेंद्र गवळी, भावेश ढाके, डॉ. मोईज देशपांडे, भरत गायकवाड, अख्तर अली सय्यद, रुग्णसेवक दीपक घ्यार, चेतन परदेशी, अनिल पवार, विशाल निकम, अतुल धनगर आदींची उपस्थिती होती.