जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (जीएमसी) जळगावसह शेजारच्या जिल्ह्यातील रुग्णांनाही उपचारात दिलासा देण्याचे काम करत असून, ओपीडीत एकाच दिवशी रुग्ण तपासणीचा अकराशेचा मोठा टप्पा पार केल्यानंतर आता पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या निमित्ताने अनुभवी डॉक्टरांची नवी फौज रुग्णसेवेत रूजू झाली आहे. बालरोग, स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र यासह इतर विविध विषयांचे ४५ अनुभवी डॉक्टर रुग्णांची तपासणी व उपचार करणार आहेत.
जीएमसीतील पदवीच्या विद्यार्थ्यांची पहिली बॅच सन २०१८-१९ या शैक्षणिक सत्रातील असून, चालू वर्षात पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांना मान्यता मिळाली आहे. त्यासाठी ४८ जागा मंजूर आहेत. आतापर्यंत ४५ जणांचे प्रवेश निश्चित झाले असून, ते रूजू देखील झाले आहेत. तीन वर्ष कालावधीचा त्यांचा अभ्यासक्रम आहे. पदव्युत्तर अभ्यासक्रमांमुळे त्या-त्या विषयातील अनुभवी डॉक्टरांची सेवा रुग्णांना उपलब्ध होणार आहे. हे डॉक्टर बाह्यरुग्ण व आंतररुग्ण विभागात नियुक्त असतील. रुग्णांची तपासणी, त्यांच्यावर उपचार आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनात वैद्यकीय क्षेत्राला उपयुक्त संशोधन करण्याचे काम त्यांच्याकडून होणार आहे. जनऔषधवैद्यकशास्त्रची १ आणि सुक्ष्मजीवशास्त्र विभागाच्या २ जागा रिक्त आहेत.
रुग्णसेवेचा दर्जा वाढणारपदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी अनुभवी डॉक्टर रूजू झाल्याने जीएमसीमधील रुग्णसेवेचा दर्जा आणखीन वाढणार आहे. हे डॉक्टर २४ तास उपलब्ध असतील. त्यांचा तीन वर्ष मुदतीचा अभ्यासक्रम आहे. या अभ्यासक्रमामुळे तज्ज्ञ डॉक्टरांची संख्या वाढण्यास मदत होणार आहे, असे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी सांगितले.
अनुभव व संशोधनाचा लाभएमबीबीएस चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी पदव्युत्तर पदवी शिक्षणासाठी वरिष्ठ तज्ज्ञ अध्यापक, डॉक्टरांच्या मार्गदर्शनात रुग्णांची तपासणी, उपचार व वैद्यकीय क्षेत्राशी निगडीत विविध विषयांवर संशोधन करतात. त्यांनी केलेल्या संशोधनाचा वैद्यकीय क्षेत्राला फायदा होतो. कमी कालावधीत जळगावच्या वैद्यकीय महाविद्यालयात पदव्युत्तर पदवीचा अभ्यासक्रम मंजूर झाला आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय गायकवाड यांनी दिली.
याप्रमाणे मंजूर जागा...औषधीशास्त्र : ०५सुक्ष्मजीवशास्त्र : ०४विकृतीशास्त्र (पॅथॉलॉजी) : ०२जनऔषधवैद्यकशास्त्र : ०४औषधवैद्यकशास्त्र (मेडिसीन) : ०७बालरोगशास्त्र : ०२स्त्रीरोग व प्रसूती : ०७बधिरीकरण : ०४अस्थिव्यंगोपचार : ०१शल्यचिकित्सा : ०९क्ष-किरण : ०३