कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शासनातर्फे विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशपरीक्षा, स्पर्धा परीक्षा स्थगित करण्यात येत आहेत. त्यात आता महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातर्फेही गेल्या वर्षी भरती झालेल्या उमेदवारांच्या अंतिम चाचणी प्रक्रियेलाही पुन्हा एकदा ब्रेक दिला आहे. यामुळे उमेदवारांकडून मनस्ताप व्यक्त करण्यात येत आहे. कोरोनामुळे बससेवा बंद असल्याने, महामंडळाचे उत्पन्न पूर्णतः ठप्प झाले होते. त्यामुळे महामंडळाने गेल्या वर्षी खर्च नियंत्रणात आणण्यासाठी या प्रशिक्षणार्थी उमेदवारांच्या प्रशिक्षणाला स्थगिती दिली होती. त्यानंतर सहा महिन्यांनी कोरोनाचे प्रमाण कमी झाल्यावर यंदा फेब्रुवारी महिन्यात ही स्थगिती उठविली होती. त्यानंतर आता कोरोनाचे प्रमाण पुन्हा वाढल्यामुळे या उमेदवारांच्या अंतिम चाचणी परीक्षेला स्थगिती दिली आहे.
इन्फो :
१७३ पैकी ६१ उमेदवारांची चाचणी पूर्ण
गेल्या वर्षी झालेल्या भरतीप्रकियेत महामंडळाच्या जळगाव विभागात चालक व वाहक मिळून १७३ उमेदवार पात्र ठरले होते. सुरुवातीला या उमेदवारांच्या भरतीप्रकियेला कोरोनामुळे काही महिने स्थगिती देण्यात आली होती. काही महिन्यांनी स्थगिती उठवून त्यांना पुन्हा कामावर बोलावण्यात आले आणि यात १७३ पैकी ६१ उमेदवारांची अंतिम चाचणी पूर्ण झाली असल्याचे विभागीय कर्मचारी अधिकारी प्रशांत महाजन यांनी सांगितले.
इन्फो :
जळगाव विभागातील १७३ उमेदवारांची अंतिम चाचणी परीक्षा कोरोनामुळे स्थगित ठेवण्यात आली आहे. या चाचणीत विविध अवघड ठिकाणी व गर्दीच्या ठिकाणी वाहन चालविण्याबाबत उमेदवारांची चाचपणी होईल. मात्र, ही प्रकिया आता राज्यातील लॉकडाऊन उठल्यानंतर होईल.
भगवान जगनोर, विभाग नियंत्रक,