जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बटाट्याची आवक वाढल्याने १०० ते २०० रुपये प्रतिक्विंटलने बटाट्याचे भाव कमी झाले आहेत. इतर भाजीपालाही मोठ्या प्रमाणावर येत असून भाव कमी झाल्याचा फायदा ग्राहकांना मिळाला आहे.
महिनाभरापूर्वी बटाट्याचे भाव वाढलेले होते. किरकोळ बाजारात ते २५ ते ३० रुपये प्रति किलोने विक्री होत होते. मात्र, गेल्या दोन आठवड्यांपासून बटाट्याची आवक वाढल्याने त्यांचे भाव कमी झाले आहेत. सध्या बटाटे १००० ते १५०० रुपये प्रति क्विंटलने विक्री होत आहेत.
वांग्याची आवक वाढलेली असून, वांग्याचे भाव ५०० रुपये प्रति क्विंटलवर आले आहेत. कांद्याचे भावदेखील २०० रुपये क्विंटलवर आले आहेत. कोथिंबीरचेही भाव २५०० रुपये क्विंटल झाले आहेत. पत्ताकोबी २० रुपये किलो, फुलकोबी ३० रुपये किलो, हिरवी मिरची २० रुपये किलो विक्री होत आहे.