भडगाव : सर्जाराजाची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पोळा सण खान्देशात परंपरेनुसार उत्साहात साजरा केला जातो. हा सण तोंडावर आला आहे. गावोगावी कुंभार बांधवांकडून परंपरागत व्यवसाय जोपासत आकर्षक मातीचे बैल बनविण्याचे काम सुरू आहे.
हा परंपरागत व्यवसाय जोपासणारे भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथील महादू लक्ष्मण कुंभार (६४) असूनही आपली कला अबाधित ठेवत पोळा सणासाठी आकर्षक मातीचे बैल बनविण्याच्या कामाची पूर्वतयारी सुरू केली आहे.
महादू कुंभार हे रेल्वेत २८ वर्षे नोकरीला होते. ते २०१६ मध्ये सेवानिवृत्त झाले. त्यांनी आपला पारंपरिक व्यवसाय सुरूच ठेवला आहे. मातीचे बैल बनविणे ही एक कलाच आहे. बैल बनविण्यासाठी नदीचा गाळ, माती, घोड्याची लीद टाकून मिश्रित केली जाते. सर्व मिश्रित करून माती बारीक तयार केली जाते. यात मेहनत खूप असते. घोड्याची लीद ही विकत आणावी लागते. मातीचे छोटे- छोटे बैल तयार करून घरोघरी दिले जातात. या मोबदल्यात कुंभार बांधवांना धान्य, तर कुठे पैसे मिळतात. यातून जेमतेम उत्पन्न मिळते. परंपरा टिकवत हा व्यवसाय सुरू आहे, अशी माहिती महादू कुंभार यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली,
तसेच दीपवालीला मातीच्या पणत्या बनवून घरोघरी दिल्या जातात. या मोबदल्यातही कुंभारबांधवांना धान्य तर कुठे पैसे दिले जातात. दीपवाली सणाला या पणत्यांमध्ये तेल टाकून प्रकाशमय वातावरण निर्माण होते, तसेच गणपती, लक्ष्मी, गुलाबाई, मूर्तीही सण, उत्सवाप्रमाणे बनवतात, तसेच घागर, लोटे, चूल, खापर, माठ, पाळ, नंदाळे, लग्नाला लागणारे रुखवताचे सामान तयार केले जाते. रांजण, कळस, वऱ्हाटा, पाटा, खलबत्ता, तुळशी वृंदावन, हत्ती, कुबेर यासह मातीच्या आकर्षक छोट्या- मोठ्या वस्तू बनवून रंगांनी आकर्षक बनतात. त्यांचीही विक्री होती, असेही कुंभार यांनी सांगितले. हा परंपरागत व्यवसाय टिकवून कलेची जोपासना करताना कुंभार बांधव.
240821\24jal_2_24082021_12.jpg
गोंडगावचे महादू कुंभार मातीचे बैल तयार करताना दिसत आहेत.