वीज वितरणची वसुली मोहीम : १५२ जणांची वीज खंडित
नशिराबाद : येथे वीज वितरण कंपनीचे ग्राहकांकडे विजेचे तब्बल ७५ लाख रुपये थकीत असून त्यामुळे वीज वितरण कंपनीने धडक वसुली मोहीम सुरू केली आहे. जे ग्राहक भरणा करत नाहीत, त्यांचा वीजपुरवठा खंडित करण्यात येत आहे. आतापर्यंत तब्बल १५२ जणांचा वीजपुरवठा खंडित केला आहे.
नशिराबादचे वीज वितरण कंपनीचे हजारो ग्राहक आहेत. मात्र गेल्या काही महिन्यांपासून ग्राहकांकडे विजेचे बिल थकीत असल्यामुळे थकबाकीचा डोंगर वाढत आहे. नियमितपणे बिल भरणारे मोजकेच ग्राहक आहेत. थकबाकी वाढवणाऱ्या ग्राहकांविरुद्ध वीज कंपनीने आता धडक कारवाई सुरू केली आहे. थकबाकी न भरल्यास त्यांचा वीजपुरवठा खंडित केला जात आहे. त्यानंतरही भरणा न केल्यास वीज मीटर काढून जप्त केले जात आहे. चालू वीज बिलाची थकबाकी व पुनर्जोडणी शुल्क भरल्यानंतर वीजपुरवठा पूर्ववत होईल. आतापर्यंत तब्बल ३४ जणांचे वीज मीटर काढण्यात आले असल्याची माहिती साहाय्यक अभियंता पवन वाघुळदे यांनी ‘लोकमत’ला दिली
अन्यथा दोघांवर होणार कारवाई
थकीत वीज बिलापोटी वीजपुरवठा खंडित केल्यानंतर पुनर्जोडणी शुल्क भरल्याशिवाय वीजपुरवठा सुरळीत केला जाणार नाही. शेजाऱ्यांकडून किंवा चोरट्या मार्गाने वीजपुरवठा घेणे धोकादायक असून यात वीज देणारा व घेणारा दोघांवर कारवाई होऊ शकते. त्यामुळे अधिकृतपणे वीज वापर करण्याचे आवाहन महावितरणने ग्राहकांना केले आहे. थकबाकी भरा व सहकार्य करा, असे आवाहन साहाय्यक अभियंता पवन वाघुळदे यांनी केले आहे.