ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 10- दिव्यांग मुलांनादेखील स्वाभिमान व स्वावलंबनाने जगता यावे यासाठी त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देत जळगावातील ‘उडाण दिव्यांग व्यवसाय प्रशिक्षण केंद्रा’ने या मुलांच्या पंखांना बळ दिले आहे. केंद्राच्या प्रशिक्षणानंतर या मुलांनी तयार केलेल्या पणत्या, सुकामेवा, चॉकलेटचे पॅकिंग बॉक्स यांना चांगलीच मागणी वाढली असून या मुलांच्या परिश्रमाला फळही येत आहे. दिव्यांग, गतीमंद, मतीमंद मुलांच्या शिक्षणाची दहावीनंतर सोय नसल्याने त्यांना रोजगाराच्या संधी नगण्यच. त्यामुळे अशा मुलांना स्वयंरोजगार करता यावा यासाठी जळगावातील आराधना कॉलनीतील रहिवासी तथा लेवा पाटील समाजाच्या ‘लेवा सम्राज्ञी ग्रुप’च्या सचिव हर्षाली प्रवीण चौधरी यांनी पुढाकार घेतला.
हर्षाली चौधरी यांच्या मुलाला अचानक अपंगत्व आले. घरात त्याचा संभाळ करण्यासाठी स्वत:सह पती व कुटुंबातील इतर सदस्य आहे, मात्र ज्या दिव्यांग मुलांची परिस्थिती नाजूक असते, त्यांचे काय? असा प्रश्न त्यांना पडला व त्यांनी दिव्यांग मुलांसाठी स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्याचा निश्चय केला. त्यानुसार त्यांनी ‘उडाण दिव्यांग व्यवसाय प्रशिक्षण केंद्रा’ची स्थापना केली व या मुलांच्या जीवनात आशेचा नवीन किरण निर्माण केला.
महिनाभरात विद्याथ्र्याच्या कामाला दामहर्षाली चौधरी यांनी एक महिन्यापूर्वीच प्रत्यक्ष प्रशिक्षण वर्गाला सुरुवात केली. यामध्ये मुलांना प्रशिक्षण मिळताच या मुलांनी आपल्यातील गुणांचे दर्शन घडविले. यामध्ये या मुलांनी दिवाळीच्या पाश्र्वभूमीवर विविध रंगाच्या व विविध आकारातील पणत्या आकारास आणल्या आहेत. सोबतच सुकामेवा, चॉकलेट यांचे पॅकिंग बॉक्स तयार करून या वस्तू त्यात भरून बाजारपेठेत नेण्यासाठी सज्ज केल्या. यामध्ये या वस्तूंना चांगलाच प्रतिसाद मिळून मोठय़ा प्रमाणात विक्री होऊन मुलांच्या हस्तकलेला दामही मिळत आहे. यासाठी या वस्तू काव्यरत्नावली चौक, सागर पार्क नजीकच्या अग्रवाल समाज सभागृह तसेच वर्सी महोत्सवात विक्रीसाठी ठेवल्या असता त्यांना चांगलीच मागणी राहिली.
एकदा सांगताच वस्तू तयारया वस्तूंचे प्रशिक्षण देताना एकदा या मुलांना कोणती वस्तू कशी करायची हे सांगितले तर त्याबाबत त्यांना पुन्हा सांगावे लागत नाही, हे विशेष.
नफा मुलांच्या भविष्यासाठीया वस्तूंमधून जो काही नफा मिळणार आहे, तो पूर्णपणे याच मुलांसाठी वापरून त्यांच्या भविष्यासाठी तो उपयोगात आणला जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. सध्या 20 मुलांच्या हाताला काम मिळाले आहे.
विविध वस्तू तयार करण्यासह आता यापुढे फळ, भाजीपाला लागवड उपक्रम राबवून मुलांना अधिक उत्पन्न मिळवून देण्याचा मनोदय हर्षाली चौधरी यांनी व्यक्त केला. या उपक्रमासाठी त्यांचे पती प्रवीण चौधरी, घरातील सर्व 12 सदस्य तसेच माहेरच्या मंडळींचीदेखील मोठी साथ मिळत आहे. या मुलांना हर्षाली यांच्यासह रईस काझी, सोनाली पाटील हे प्रशिक्षण देत आहे. सोबतच लीना चौधरी, सुप्रिया चौधरी, शुभांगी चौधरी, अनघा कुलकर्णी, राजश्री कुलकर्णी, लता अग्रवाल, हेमा शिरसाळे, बापू पाटील, सुभाष पाटील, स्वाती गोरे, वसुधा महाजन, धनंजय महाजन, अलका कोल्हे हे सहकार्य करतात.