नशिराबाद : ग्रामपंचायत कार्यालयाची सुमारे एक लाख ९० हजार रुपये वीज बिलाची रक्कम थकल्यामुळे वीज वितरण कंपनीने ग्रामपंचायतीचा वीजपुरवठा खंडित केला आहे. कार्यालयाची वीज खंडित होण्याची नामुष्की ग्रामपंचायतीवर आली आहे. या सोबतच शेळगाव बॅरेज येथून होणाऱ्या पाणीपुरवठ्याची सुमारे ३१ लाख ३० हजार ६१९ रुपये थकबाकी असल्यामुळे वीजपुरवठा बुधवारी खंडित करण्यात आला. त्यामुळे ग्रामपंचायत अंधारात राहण्यासह ग्रामस्थांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे.
येथील ग्रामपंचायतीकडे विजेची लाखो रुपये थकीत आहे. काही दिवसांपूर्वीच गावात सुरु असलेली आरओ प्रणाली केंद्राचाही वीज पुरवठा खंडित करण्यात आला. त्याचीही सुमारे १२ ते १४ लाख रुपये थकबाकी आहे. थकबाकीचा हा डोंगर वाढत असल्याने वीज कंपनीने थेट वीजपुरवठा खंडित केला. त्यातच आता ग्रामपंचायत कार्यालयाचाही वीजपुरवठा खंडित करण्यात आला. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या कारभाराला ग्रहण लागले असल्याचे चित्र आहे. आरओ प्रणाली केंद्र बंद असल्यामुळे पाच रुपयात शुद्ध मिळणाऱ्या पाण्याचा पुरवठाही खंडित झाला आहे. आरओ प्रणाली केंद्र पूर्ववत सुरू करण्यात यावे, अशी मागणी होत आहे
चार गावांच्या पाणीपुरवठ्याची वीज खंडित
शेळगाव बॅरेज येथून चार गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेचे लाखो रुपये थकल्याने महावितरणने पाणीपुरवठ्याची वीज बुधवारी खंडित केली.आसोदा, भादली, शेळगाव, कानसवाडा या चारही गावांना पाणीपुरवठा करणारी ही योजना आहे. त्याची सुमारे ७९ लाख ८५ हजार ९६६ रुपये थकबाकी झाल्याने बुधवारी वीज पुरवठा खंडित करण्यात आला, अशी माहिती भादली कक्षाचे कनिष्ठ अभियंता राहुल निकम व उपकार्यकारी अभियंता मेघश्याम सावकारे यांनी लोकमतला दिली.