शिरसोली प्र नं. व शिरसोली प्र बो या दोन्ही गावांची सामूहिक पाणी पुरवठा योजना असून या गावांना पिण्याचा पाण्याचा पुरवठा सुरळीतपणे व्हावा यासाठी दापोरे गावातील गिरणा नदीपात्राच्या काठावर विहीर खोदण्यात आली आहे. याच विहिरीतून पाणी शिरसोली येथे बांधलेल्या दोन मोठ्या पाण्याच्या टाकीतून ग्रामस्थांच्या घराघरापर्यंत पोहोचते. दोन्ही गावांची लोकसंख्या ही ४० हजारांच्या घरात असल्याने दोन्ही गावांना आळीपाळीने आठ दिवसाच्या अंतराने पिण्याचे पाणी मिळते.
परंतु यंदा ऐन उन्हाळ्यात वीज वितरण कंपनीने विजेची थकबाकी असल्याने दि.११ मार्च रोजी कुठलीही पूर्वसूचना न देता पाणी पुरवठा योजनेची वीज खंडित केल्याने शिरसोली गावाचा पाणी प्रश्न बिकट झाला आहे. तरी वीज वितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिका-यांनी उन्हाळ्याचा विचार करता वीज प्रवाह सुरळीत करून शिरसोलीकरांची पाण्यासाठी होणारी धावपळ थांबवावी, अशी मागणी केली जात आहे.