हितेंद्र काळुंखे/जळगाव - उर्जा ही एक प्रकारची शक्ती असून ही शक्ती सहज प्राप्त व्हावी, असे एक ‘सुंदर उर्जा स्थान’ जळगावच्या मेहरुण तलावाच्या काठावर मल्हारा परिवाराने साकारले आहे. वा-याची झुळूक, झाडांची सावली, अथांग पाणी, प्रसन्नमय शांतता हे शब्दच मनाला आनंद देवून जातात. प्रत्यक्षात या सा-या गोष्टी जेथे एकवटल्या आहेत, तेथे थकलेल्या शरिराला व मनाला किती उर्जा मिळत असेल हे अशा ठिकाणी गेल्यावरच समजते. असा एक पॉईन्ट जळगावकरांसाठी मल्हारा परिवाराने स्वत: च्या पदरचे पैसे खर्च करीत साकारला, ही बाब निश्चितच इतरांसाठी प्रेरणादायी असून त्यांच्या या कौतुकास्पद कार्यामुळे प्रशासनाने देखील ‘उर्जा’ घेत काही कामे या ठिकाणी हाती घेतली आहेत. यामुळे हा पॉईन्ट अधिकच खुलत आहे.
.... अशी झाली निर्मिती उर्जा पॉईन्टचीशैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलले निसर्गप्रेमी सुंदरलाल मल्हारा हे मेहरुण तलावाच्या काठावर सकाळी फिरायला जायचे. ब-यादा मुले शेखर, आनंद, विकास , प्रशांत यांनाही न्यायचे. या ठिकाणी दोन निंबाची झाडे आहेत. सुंदरलाल मल्हारा यांना त्या झाडाबद्दल खूप प्रेम होते त्यांना ते लहान मुलांप्रमाणे गोंजारत , मिठी मारत आज ती झाडे मोठी झालीत. सुंदरलाल मल्हारा यांच्या स्वर्गवासानंतरही मल्हारा परिवारातील सदस्यांची पावलं नेहमीच या ठिकाणी वळायची. तलावाकाठच्या मंदिराबाजुच्या रस्त्यावर पुढे असलेले हे स्थान खरोखरच हवेच्या दृष्टीने खूप विशेष असे आहे. मात्र या ठिकाणी बसायला चांगली जागा नाही. याची दखल घेत लोकांनाही या जागेचा आनंद वाटावा म्हणून आनंद मल्हारा परिवाराने या ठिकाणी पार बांधले. थकले भागलेले व फिरायला येणारे लोक तेथे बसू लागले आणि या ठिकाणी विसावल्यावर मिळणारा आनंद पाहता ही संख्या वाढू लागली. हे पाहता काही बाकही ठेवण्यात आले. लोकांचा चांगला प्रतिसाद पाहून उर्जा पॉईन्ट निर्मिती करण्याची प्रेरणा मल्हारा परिवाराला मिळाली आणि प्रत्यक्षात तो साकारला जाऊन सुंदरलाल मल्हारा यांच्या स्मरणार्थ नुकतेच त्याचे लोकार्पणही करण्यात आले.
जिल्हाधिकारी, आमदार, महापौर यांचाही पुढाकार‘सुंदर उर्जा पाईन्ट’ च्या लोकार्पण कार्यक्रमास उपस्थित असलेले. जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, आमदार सुरेश भोळे, महापौर ललित कोल्हे यांनी या ठिकाणाचे महत्व लक्षात घेत या परिसराचा अधिक विकास साधण्याचे आश्वासन दिले आहे. एवढेच नाही तर जिल्हाधिकारी यांनी पुढाकार घेवून दुस-या दिवशीच येथे दिवे लावण्याचे काम हाती घेतले व तातडीने पूर्ण केले.
साकारायचाय जॉगिंग ट्रॅकउर्जा पॉईन्ट अधिकच खुलविण्यासाठी या ठिकाणी एकूण ४० झाडे लावण्यात आली आहेत. यासाठी मल्हार यांच्या सीएमवायके युनिटच्या कर्मचा-यांनीही पुढे येत परिश्रमाचे सिंचन केले. प्रशासनाकडून पुढे विकास साधत असताना याच रस्त्यावर जॉगिंग ट्रॅक व्हावा व प्रशासनाने त्या दृष्टीने नियोजन करावे अशी अपेक्षाही मल्हारा परिवाराची आहे.उर्जा पॉन्टची निर्मिती ही दोन झाडांभोवती ओटे करण्याच्या कामापासून झाली. लोकांचा चांगला प्रतिसाद पाहून समाधान वाटले. हळूहळू त्यातूनच हा परिसर विकसित करण्याची उर्जा मिळत गेली. मुलगा तनय हा शिक्षणासोबतच डान्स शोच्या माध्यमातून पैसे कमवत आहे. त्यातील ४० टक्के हिस्सा हा विविध चांगल्या कामासाठी खर्च केला जात आहे. समाजातील प्रत्येकाने असे काम करायला हवे. - आनंद मल्हारा, जळगाव.