शिवाजीनगर उड्डाणपूल : निधी खर्चाला मंजूरी मिळण्याबाबत शासनाकडे मनपाचा प्रस्ताव
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शिवाजीनगर उड्डाणपुलाचे आतील काम वेगाने सुरू असून, जिल्हा परिषदेच्या बाजूने बाहेरील काम मात्र विद्युत खांबाच्या अडथळ्यामुळे पुन्हा बंद पडले आहे. या खांबामुळे केळकर मार्केटपासून पुलाचा ‘चढाव’ उभारणे शक्य नसल्याचे बांधकाम विभागातर्फे सांगण्यात आले; तर खांब काढण्यासाठी महापालिकेने मंजूर केलेला निधी खर्च करण्याची परवानगी मिळण्याबाबत महापालिकेने शासनाकडे प्रस्ताव पाठविला आहे.
गेल्या दोन वर्षांपासून शिवाजीनगर उड्डाणपुलाचे काम सुरू असून, दोन वर्षांची मुदत संपल्यावरही पुलाचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यामुळे शिवाजीनगरवासीयांचे हाल सुरूच असून, त्यांना जीव धोक्यात घालून तहसील कार्यालयाकडून रेल्वे रूळ ओलांडून वापर करावा लागत आहे. दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून शिवाजीनगर उड्डाणपुलाच्या आतील बहुतांश काम पूर्ण झाले असून, मक्तेदारातर्फे गेल्या आठवड्यापासून जिल्हा परिषदेसमोरील बाहेरील कामालाही सुरुवात करण्यात आली. या ठिकाणी खोदाईचे काम नुकतेच पूर्ण झाले आहे. मात्र, केळकर मार्केटपासून पुलाला सुरुवात होणार असल्याने, केळकर मार्केटसमोर पुलाची चढाई उभारण्यास विद्युत खांबामुळे अडथळा येत आहे. विद्युत खांब काढल्यानंतर मक्तेदाराला पुलाच्या चढाईचे काम करता येणार आहे. त्यामुळे विद्युत खांब हटविणे गरजेचे असून, या खांबाच्या अडथळ्यामुळे पुलाचे बाहेरील काम थांबले असल्याचे सांगण्यात आले.
इन्फो :
निधीच्या खर्चाबाबत शासनाकडे मागितली परवानगी
महापालिकेने शिवाजीनगर उड्डाणपुलाच्या कामाला अडथळा ठरणारे विद्युत खांब काढणे व त्याच ठिकाणी नवीन विद्युतलाईन उभारण्यासाठी दीड कोटींचा मंजूर केला आहे. मात्र, हा निधी खर्च करण्याची परवानगी मिळण्याबाबत महापालिकेच्या प्रशासनाने शासनाकडे प्रस्ताव पाठविला असल्याची माहिती महापालिकेच्या प्रशासनातर्फे देण्यात आली.
इन्फो :
सध्या पुलाचे आतील काम वेगाने सुरू असून, बाहेरील काम विद्युत खांबाच्या अडथळ्यामुळे बंद आहे.
विद्युत खांबांच्या अडथळ्यामुळे बाहेरील कामाला प्रचंड विलंब होत आहे. हे खांब हटविल्यानंतर फक्त तीन महिन्यांत पुलाचे बाहेरील काम पूर्ण केले जाईल.
- प्रशांत सोनवणे, अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग
इन्फो:
महापालिकेने विद्युत खांब काढण्यासाठी मंजूर केलेल्या निधीच्या खर्चाला परवानगी मिळण्याबाबत, तसेच हे काम कोणी करावे, याबाबत शासनाकडे परवानगी मागितली आहे. शासनाच्या परवानगीनंतर निविदा प्रक्रिया राबविण्याबाबत निर्णय घेण्यात येईल.
- सतीश कुलकर्णी, आयुक्त, महापालिका