जळगाव : गुटखा, पान मसाला,सुगंधित तंबाखु, सुपारी, खर्रा व मावा या प्रतिबंधीत अन्न पदार्थाच्या बंदीची प्रभावी अमलबजावणी करण्यासाठी पोलिसांना आता अधिकार देण्यात आले असून अन्न व औषध विभागाची परवानगी घेण्याची गरज नाही. पोलीस थेट गुन्हा नोंदवू शकतात, याबाबतचे आदेश पोलीस महासंचालकांनी काढले प्रत्येक पोलीस अधीक्षक व आयुक्तांना त्याची प्रत पाठविण्यात आली आहे.अन्न व औषध प्रशासनाचे अन्न सुरक्षा आयुक्त यांनी पोलीस दलाला विनंती केली असून अन्न सुरक्षा अधिकारी यांचा प्रतिबंधीत अन्न पदार्थ प्रकरणी दिलेला भादवि कलम १८८, २७२, २७३ व ३२८ अंतर्गत प्रथम खबरी अहवाल दाखल करुन घेण्याबाबत सर्व घटक प्रमुखांना निर्देश देण्यात आलेले आहेत. यापूर्वी ५ फेबु्रवारी २०२० रोजी उपमुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यात भादवि कलम १८८, २७२, २७३ व ३२८ पोलिसांना स्वतंत्र कारवाईचे अधिकार प्रदान करण्यात आले. त्यामुळे पोलिसांना आता अन्न व औषध प्रशासन विभागाला सोबत न घेताही कारवाई करता येणार आहे. दरम्यान, अन्न व औषध विभागाने कारवाई करावयची झाल्यास पोलीस बंदोबस्ताची मागणी केली तर पोलिसांना बंदोबस्त पुरवावा लागणार आहे. पोलीस महासंचालक कार्यालयातील विशेष पोलीस महानिरीक्षक मिलिंद भारंबे (कायदा व सुव्यवस्था) यांच्या स्वाक्षरीने हे आदेश जारी झालेले आहेत.एफडीएचा ताण कमी होणारअन्न व औषध प्रशासन विभागाकडून नेहमीच मनुष्यबळाच्या नावाखाली कारवाया कमी होत असल्याचे सांगितले जात होते, आता थेट पोलिसांनाच अधिकार प्राप्त झाल्याने या विभागाचा ताण कमी झाला आहे.
अवैध गुटख्यासंदर्भात पोलिसांना गुन्हे नोंदविण्याचे अधिकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2020 11:59 AM