लोकमत न्यूज नेटवर्क
अमळनेर : मागील वर्षीप्रमाणे यंदाही येथील संत सखाराम महाराज संस्थांनचे गादीपती प्रसाद महाराज यांच्या पंढरपूर पायी वारीवर निर्बंध आले असले तरी परंपरा जोपासण्यासाठी महाराज यावेळी मोठी पायी वारी न नेता आपल्या खाजगी वाहनाने चार दिवसांनंतर पंढरपूरचा प्रवास करून वारी पूर्ण करणार आहेत.
प्रसाद महाराजांच्या यंदाच्या वारीचे शुक्रवारी जेष्ठ वद्य प्रतिपदेला प्रस्थान होणार आहे. प्रत्यक्षात दि. २५ रोजी सकाळी संत सखाराम महाराज संस्थानच्या वाडीत भजन आणि प्रस्थानाचे अभंग होईल. त्यानंतर संत सखाराम महाराजांच्या समाधीवर पताका व ज्ञानेश्वरी ठेवली गेल्यानंतर संत प्रसाद महाराज यांची वारी सुरू होणार आहे. मात्र वारी सुरू होऊनही महाराज चार दिवस अमळनेरातच मुक्कामी असणार असून साधारणपणे चार दिवसांनंतर आपल्या खाजगी वाहनाने पंढरपूरकडे त्यांचे प्रस्थांन होणार आहे. त्यानंतर १ किंवा २ जुलै रोजी महाराज पंढरपूर पोहोचतील. दि २० जुलै रोजी आषाढी एकादशी असून यासाठी प्रसाद महाराजांना शासनाची परवानगीदेखील मिळाली आहे.
दरवर्षी पंढरपूरच्या वेशीवर ज्ञानेश्वर महाराज व तुकाराम महाराज यांच्या पालखीला नारळ देण्याचा मान अमळनेर येथील संत सखाराम महाराज संस्थांनच्या गादी पुरुषांना मिळत असतो. दरम्यान दरवर्षी वटपौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी जेष्ठ वद्य प्रतिपदेला महाराजांच्या पायीवारीस अमळनेर येथून सुरवात होत असते. यात असंख्य महिला व पुरुष भाविक सहभागी होत असतात. २४ दिवस खडतर प्रवास व ऊन वारा, पाऊस अंगावर घेत महाराज आपली वारी घेऊन पंढरपूर पोहचत असतात.
कोरोना प्रादुर्भाव आणि निर्बंधांमुळे गेल्यावर्षीपासून वारीवर निर्बंध येत असले तरी प्रसाद महाराज वारी पूर्ण करून परंपरा जोपासत आहेत.