शरदकुमार बन्सीधरणगाव : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण या विचाराचा वसा घेवून गेली ३३ वर्षे भगवा एकनिष्ठपणे खांद्यावर घेवून शिवसेना उपनेते, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील हे वाटचाल करत आहेत. लोकांच्या आग्रहामुळे राजकारणात आलेले गुलाबरावांचे सुपुत्र जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील हे वडिलांचा रुग्णसेवेचा वारसा समर्थपणे पुढे चालवित आहेत. कुठलीच कौटुंबिक राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या गुलाबराव पाटील यांनी १९८५ मध्ये धरणगाव तालुक्यातील पाळधी या जन्मगावी शिवसेनेची शाखा स्थापन केली व ते शाखाप्रमुख बनले. १९९१ ला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या चाळीसगाव येथील सभेत गुलाबरावांना भाषणाची संधी मिळाली आणि तेथूनच राजकीय वाटचालीला खरी सुरुवात झाली. शाखाप्रमुख, उपतालुकाप्रमुख, जिल्हाप्रमुख, उपनेते आणि एरंडोल पंचायत समिती सदस्य, जळगाव जिल्हा परिषद सदस्य व कृषी सभापती, एरंडोल मतदारसंघाचे दोन वेळा आमदार व त्यानंतर जळगाव ग्रामीणचे आमदार, सहकार राज्यमंत्री अशी राजकारणातील चढती कमान गुलाबरावांनी गाठली आहे.कार्यकर्ते व लोकाग्रहास्तव गुलाबराव पाटील यांनी त्यांचे सुपुत्र प्रताप पाटील यांना राजकारणात आणले. पाळधी-बांभोरी जिल्हा परिषद गटात प्रताप हे विजयी होऊन गुलाबरावांचा वारसा पुढे चालवित आहे. युवकांचे संघटन, ग्रामीण भागातील नागरिकांच्या अडचणीत धावून जात त्यांनीही हा वारसा पुढे घेवून जाण्याच्या दिशेने योग्य पाऊल टाकले आहे. ३३ वर्षे एकाच विचाराचा पाईक बनून पाटील परिवाराने वसा आणि वारसा जपला आहे.परिवाराची खंबीर साथ...गुलाबराव पाटील यांना गेल्या ३० वर्षाच्या राजकीय प्रवासात आई दगूबाई, पत्नी मायाबाई, मुलगा प्रताप, लहान मुलगा विक्रम, मुलगी प्रियंका यांची खंबीर साथ मिळाली असे ते सांगतात. तर आई-वडिलांचा आदर्श घेत पत्नी ममता हिचीही मला साथ आहे म्हणूनच मी वडिलांचा वारसा चालवतोय असे जि.प.सदस्य प्रताप पाटील यांनी सांगितले.
प्रताप पाटील यांचे गुलाबरावांच्या पावलांवर पाऊल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2018 3:44 PM