प्रयत्नशील
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव - मनपा महापौर व उपमहापौरपदासाठी आता भाजपमध्येच आता रस्सीखेच सुरू झाली आहे. माजी मंत्री गिरीश महाजन हेच अंतिम निर्णय घेणार असून, शुक्रवारी शिवजयंतीनिमित्त गिरीश महाजन जळगाव शहरात येणार आहेत. या दरम्यान काही इच्छुक महाजनांची भेट घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. महापौरपदासाठी प्रतिभा कापसे यांचे नाव सर्वात आघाडीवर असून, विद्यमान महापौर भारती सोनवणे यांना मुदतवाढ देण्यात यावी, यासाठी देखील काही नगरसेवक महाजन यांची भेट घेण्याची शक्यता आहे.
महापौरपदासाठी भाजपमध्ये अनेक गट-तट निर्माण झाले आहेत. निवड प्रक्रिया जशी जवळ येत आहे. तशी इच्छुकांची संख्यादेखील वाढत आहे. भाजपकडून उज्ज्वला बेंडाळे, ज्योती चव्हाण, दीपमाला काळे यांचे नाव देखील चर्चेत आहे. तर प्रतिभा कापसे यांच्या नावासाठी नगरसेवकांसह आमदार सुरेश भोळे हे देखील आग्रही आहेत. बेंडाळे, चव्हाण यांनाही संधी मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र, ही संधी पहिल्या टप्प्यात दिली जाईल की नंतर याबाबत गिरीश महाजन हेच निर्णय घेणार आहेत.
नगरसेवकांकडून दबावगट निर्माण करण्याचा प्रयत्न
इच्छुकांकडून काही नगरसेवकांना सोबत घेऊन नगरसेवकांची जास्तीत जास्त संख्या आपल्याकडे खेचून पक्ष नेतृत्वावर दबावगट निर्माण केला जात आहे. आपल्या बाजूने नगरसेवकांना सोबत घेऊन महाजन व इतर प्रमुख पदाधिकाऱ्यांचा भेटी घेऊन काही जणांचे नावे सुचविली जात आहेत. विद्यमान महापौर भारती सोनवणे यांना मुदतवाढ देण्यात यावी, यासाठीही काही नगरसेवक सक्रिय झाले असून हे नगरसेवक शुक्रवारी गिरीश महाजन यांची भेट घेणार आहेत.
उपमहापौरांसाठीही फिल्डिंग
महापौरपदासह उपमहापौरपदासाठी देखील फिल्डिंग लावली जात आहे. विद्यमान उपमहापौर सुनील खडके यांना चार महिने मिळाल्याने अजून सहा महिने कार्यकाळ वाढून मिळावा यासाठी खडके आग्रही आहेत, तर सुरेश सोनवणे यांच्यासाठी आमदार सुरेश भोळे आग्रही आहेत. यासह गटनेते भगत बालाणी, डॉ.चंद्रशेखर पाटील यांनी गिरीश महाजन यांची भेट घेऊन मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
शिवसेनेकडून ‘वेट ॲण्ड वॉच’ची भूमिका
भाजपत महापौरपदावरून गटबाजी वाढत जात असल्याने या घडामोडींवर शिवसेनेचे नेते नजर ठेवून आहेत. भाजपतील अंतर्गत गटबाजीचा फायदा होईल की भाजपमधील गटबाजीच बंडाचे स्वरूप घेईल, यावर शिवसेना नेत्यांचे मंथन सुरू आहे. महापौरपदाची निवड प्रक्रिया जवळ आल्यानंतरच याबाबत निर्णय घेतला जाईल, अशी माहिती शिवसेनेच्या नेत्यांनी दिली. सेनेकडे पुरेसे बहूमत नाही अशा परिस्थितीत भाजपतील गटबाजीवरच शिवसेनेची भूमिका ठरणार आहे.