लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. हा संसर्ग रोखण्यासाठी शासनाने काही निर्बंध घालून दिले आहेत. त्यामुळे रमजानसारख्या पवित्र उत्सवाला एकत्र येऊन किंवा कुठे बाहेर न जाता घरीच नमाज पठण करून प्रशासनाला संपूर्ण सहकार्य करावे व सर्व नियमांचे पालन करावे आणि कोरोनाचा मुकाबला करण्यास आपले महत्त्वाचे योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी केले.
पवित्र रमजान सणाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी सायंकाळी ६.३० वाजता शहर पोलीस ठाण्याच्या आवारात शांतता कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, पोलीस उपअधीक्षक कुमार चिंथा तसेच शहरातील सर्व पोलीस ठाण्यांचे पोलीस निरीक्षक, राष्ट्रवादीचे पदाधिकारी गफ्फार मलिक, माजी उपमहापौर डॉ. करीम सालार, अयाज अली नियाज अली, फारूख शेख तसेच धर्मगुरू व ट्रस्टींसह मुस्लीम समाज बांधव उपस्थित होते.
गर्दी करू नका...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मशिदीत फक्त पाच व्यक्तींनीच नमाज पठण करावे. त्या ठिकाणी गर्दी करू नये. तसेच इफ्तारसुद्धा घरीच थांबून करावे. ईद आणि शबे कद्रची नमाजसुद्धा घरीच पठण करावे. रात्रीच्या संचारबंदीच्या वेळी कुठेही गर्दी करू नये, असे आवाहन पोलीस अधीक्षकांनी बैठकीत केले. दरम्यान, ज्या ठिकाणी मुस्लीम वसाहत असेल त्या ठिकाणी फळविक्रेत्यांना परवानगी देण्यात यावी, जेणे करून त्या भागातील समाज बांधवांना पवित्र रमजान सणात आवश्यक फळ व खजूर खरेदी करता येतील व बाहेर जाण्याची आवश्यकता नसेल, अशी मागणी बैठकीत करण्यात आली. त्यास पोलीस अधीक्षकांनी परवानगी दिली असल्याची माहिती अयाज अली नियाज अली यांनी ‘‘लोकमत’’शी बोलताना दिली.