जळगाव : ग.स.सोसायटीत नियमबाह्य नोकरभरतीबाबत दाखल गुन्ह्यात ग.स.सोसायटीचे माजी चेअरमन विलास यादवराव नेरकर व व्यवस्थापक संजय दत्तात्रय ठाकरे या दोघांचा अटकपूर्व जामीन न्या.आर.जे.कटारिया यांच्या न्यायालयाने शनिवारी फेटाळून लावला. सरकारतर्फे ॲड.सुरेंद्र काबरा यांनी तर मुळ फिर्यादी मनोज पाटील यांच्यावतीने ॲड.शैलेश देसले यांनी बाजू मांडली.
व्यापाऱ्यास मारहाण करुन मोबाईल लांबविला
जळगाव : विसनजी नगरात मंदिराजवळ जगदीश पुनमचंद अग्रवाल (६०) यांना अनिल शंकर अग्रवाल यांनी मारहाण करुन त्यांच्या खिशातील तीन हजार रुपये किमतीचा मोबाईल हिसकावून नेल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुचाकीवरुन आलेल्यांनी मोबाईल लांबविला
जळगाव : रस्त्याने पायी जात असताना मागून दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी धर्मेश कैलास कुंभार (१७,रा.कडगाव, ता.जळगाव ह.मु.फाॅरेस्ट कॉलनी) या विद्यार्थ्याच्या हातातील मोबाईल लांबविल्याची घटना शुक्रवारी सकाळी ९ वाजता ख्वॉजामिया चौकात घडली.याप्रकरणी शनिवारी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तरुणीसमोर अश्लिल हावभाव
जळगाव : पिंप्राळा हुडको भागात १९ वर्षीय तरुणीसोबत अश्लील हावभाव करुन तिच्याशी अश्लील संभाषण केल्याप्रकरणी सुरेश बंडू वाघ (४२) याच्याविरुध्द रामांनद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार १८ रोजी रात्री पिंप्राळा हुडको भागात घडला. तपास सहायक फौजदार गोपाळ चौधरी करीत आहे.
गणेश कॉलनीतून दुचाकी लांबविली
जळगाव : गणेश कॉलनीत रोहन गजानन पजई (२७) या तरुणाची २० हजार रुपये किंमतीची दुचाकी (क्र.एम.एच.३० ए.एस.४५६४) चोरट्याने लांबविल्याची घटना १८ रोजी रात्री घडली. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास तुषार जावरे करीत आहे.
नवी पेठेतून दुचाकी लांबविली
जळगाव : नवी पेठेतील हॉटेलसमोरुन सचिन अनिल अडावदकर (२५) या तरुणाची ४० हजार रुपये किंमतीची दुचाकी (क्र.एम.एच.१९ डी.डी.३५१२) १८ रोजी रात्री चोरी झाली आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास राजकुमार चव्हाण करीत आहे.
कंटेनरमधून रोकड व मोबाईल लांबविला
जळगाव : महामार्गावर जळगाव खुर्दजवळ कंटेनरच्या कॅबिनमधून ८ हजार रुपये रोख व ६ हजार रुपये किंमतीचा मोबाईल चोरट्यांनी लांबविल्याची घटना शुक्रवारी रात्री १० वाजता घडली. याप्रकरणी चालक सचिन मानसिंग शर्मा (रा.कुरावर, जि.सिहोर, मध्य प्रदेश) याच्या फिर्यादीवरुन शनिवारी नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.