मिलिंद कुलकर्णीलोकसभेप्रमाणे यंदाची विधानसभा निवडणूक ही अभूतपूर्व होईल, असे चित्र आतापर्यंतच्या घडामोडींवरुन दिसून येत आहे. ‘अभी नही, तो कभी नही!’ असे इरेला पेटून सर्वच राजकीय पक्षांचे इच्छुक उमेदवार पहिली लढाई पक्षांतर्गंत विरोधकांशी लढत आहे. स्वत:ची कामगिरी, सक्षमता आणि निवडणूक जिंकण्याची क्षमता हे मुद्दे पक्षश्रेष्ठींना पटवून देण्यापेक्षा पक्षांतर्गत प्रतिस्पर्धी उमेदवाराविषयी कान भरण्याचे, अफवा पसरविण्याचे उद्योग सुरु झाले आहेत. स्वाभाविकपणे पक्षांतर्गंत गटबाजी फोफावली असून पक्षशिस्त राखण्याचे नवे काम नेत्यांना करावे लागत आहे.विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्टÑवादी काँग्रेसमध्ये आघाडी होणार हे निश्चित झाले आहे. कोणता पक्ष कोणत्या जागा लढवणार हेदेखील बहुदा ठरले असावे, परंतु आताच त्यांची घोषणा करणे बंडखोरी आणि नाराजीला वाट करुन देण्यासारखे असल्याने निर्णय गुलदस्त्यात ठेवलेला दिसतोय. पण तरीही जळगाव जिल्ह्यात जागावाटपाची बातमी फुटलीच. त्यावरुन काँग्रेस भवनात गदारोळ माजला. कार्यकर्त्यांच्या हाती आलेल्या माहितीनुसार जळगाव शहर आणि रावेर हे दोनच मतदारसंघ आघाडीअंतर्गत काँग्रेसच्या वाट्याला आलेले आहेत. ११ पैकी ९ मतदारसंघ राष्टÑवादीकडे गेले आहेत. कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया स्वाभाविक आहे. पण काँग्रेसदेखील यापेक्षा अधिक जागांसाठी आग्रही होती काय, हे देखील समजून घ्यायला हवे. मुळात २०१४ च्या विधानसभा निवडणुकीचे सूत्र लक्षात घेतले तर त्या निवडणुकीत दोन्ही काँग्रेसने स्वबळावर निवडणूक लढवली होती. ११ पैकी १० जागांवर राष्टÑवादीच्या उमेदवाराने काँग्रेस उमेदवारापेक्षा अधिक मते मिळविली होती. केवळ रावेरचा अपवाद होता. दुसरा मुद्दा म्हणजे, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस विनायक देशमुख यांच्या उपस्थितीत आयोजित प्रशिक्षण शिबीर केवळ ३ मतदारसंघात झाले. त्यावरुन अंदाज आला होताच की, काँग्रेस याच मतदारसंघावर भर देणार आहे. त्यातही आता जामनेर वगळले गेले आहे.भाजपकडे इच्छुक उमेदवारांची मोठी गर्दी असली तरी तेथे ‘ससा-कासवा’ची स्पर्धा देखील दिसून येत आहे. काहींनी सहा महिन्यांपासून पूर्वतयारी सुरु केली होती तर काहींनी दोन महिन्यांत कार्यक्रमांचा, यात्रेचा, भूमिपूजनाचा, वैयक्तीक लाभ मिळवून देण्याचा धडाका लावला आहे. हा उत्साह पाहता उमेदवारी जणू निश्चित आहे, असेच कुणालाही वाटावे. मात्र काही अनुभवी आणि सुज्ञ उमेदवार हे शांततेने आणि संयमाने तयारी करीत आहे. प्रकाशझोत आणि धूमधडाका न करता चाललेली वाटचाल थेट पक्षश्रेष्ठी आणि मतदारांच्या लक्षात कशी येईल, असे नियोजन सुरु आहे.काही विषय निवडणुकीत कसे महत्त्वाचे ठरतात, हे चाळीसगावमध्ये दिसून आले. ‘बेलगंगा’चा विषय घेत २०१४ मध्ये उन्मेष पाटील यांनी विधानसभा निवडणूक जिंकली होती. त्यावेळी उमेदवारी मिळविण्यासाठी त्यांना गिरीश महाजन यांची मदत झाली होती. लोकसभा निवडणुकीतही महाजन यांच्यामुळेच त्यांना ऐनवेळी तिकीट मिळाले. आता हाच ‘बेलगंगे’चा विषय घेऊन चित्रसेन पाटील रिंगणात उतरले आहेत. उन्मेष पाटील हे पत्नी संपदा यांच्या उमेदवारीसाठी आग्रही आहेत तर त्यांचे सहकारी राहिलेले मंगेश चव्हाण हे आव्हान उभे करुन आहेत. महाजन यंदा कुणाच्या पारड्यात वजन टाकतात, हे निर्णायक ठरणार आहे.लोकसभा निवडणुकीत भाजपने घवघवीत यश मिळविल्याने आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हा हुकुमाचा एक्का भाजपकडे असल्याने इच्छुकांची मोठी संख्या त्यांच्याकडे असणे अगदी स्वाभाविक आहे. परंतु, तिकीट एकालाच मिळणार आहे. न मिळालेले इच्छुक त्यावेळी कोणती भूमिका घेतात, हे पाहणे रंजक ठरणार आहे. विरोधी पक्षातील मंडळींना आपल्यात सामावणाऱ्या भाजपला ऐनवेळी हेच इच्छुक प्रतिस्पर्धी उमेदवार बनून उभे ठाकले तर नवल वाटायला नको. भाजप त्याचाही अंदाज घेत आहे.
vidhan sabha 2019 : निवडणूकपूर्व संशयकल्लोळ !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2019 12:47 PM