लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्ह्यात यंदा मुदतीआधीच मान्सून दाखल झाला असला तरी जिल्ह्यात अद्यापही दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. जिल्ह्यात दरवर्षी हंगामपूर्व कापसाची मोठ्या प्रमाणात लागवड केली जात असते. यावर्षी जिल्ह्यात आतापर्यंत ९० ते ९५ हजार हेक्टर क्षेत्रावर हंगामपूर्व (उन्हाळी) कापसाची लागवड झाली आहे. मात्र, जिल्ह्यात पाऊस न झाल्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा चिंता वाढल्या आहेत. यावर्षी आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाला मागणी राहणार असल्याने, जिल्ह्यात कापसाच्या लागवड क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता कृषी विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे.
जिल्ह्यात एकूण खरीप लागवड क्षेत्रापैकी ८० टक्के क्षेत्रावर कापसाची लागवड होत असते. जिल्ह्यात ७ लाख ३० हजार हेक्टरवर खरीप पिकांची लागवड होते. त्यात ५ लाख हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड होते. यावर्षी जिल्ह्यात ५ लाख ३५ हजार क्षेत्रावर कापसाचा पेरा होण्याची शक्यता आहे. त्यात हंगामपूर्व कापसाचे क्षेत्रदेखील मोठ्या प्रमाणात असते. आतापर्यंत जिल्ह्यातील ९० हजार हेक्टर क्षेत्रावर कापसाची पेरणी झाली असून, जिल्ह्यात पावसाचे आगमन झाल्यास मान्सूननंतर लागवड होणाऱ्या कापसाचीही लागवड सुरू होईल. २५ जूनपर्यंत जिल्ह्यात कापसाची पेरणी पूर्ण होण्याची शक्यता आहे. दरम्यान, कृषी विभागाने १०० मि.मी. पाऊस झाल्याशिवाय इतर पिकांची पेरणी न करण्याचे आवाहन केले आहे. कारण पावसाचा खंड पडल्यास शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट निर्माण होऊ शकते.