आनंद सुरवाडे
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : मोहाडी शिवारातील महिला रुग्णालयात कोविडसाठी ८०० बेडचे नियोजन असून तिसऱ्या लाटेत या रुग्णालयातच सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याला प्राधान्य राहणार आहे. यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील फिजिशियन तसेच आयसीयूचे मनुष्यबळही त्या ठिकाणी हलविण्यात येऊ शकते, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी सांगितले.
सद्यस्थितीत रुग्णांची संख्या अत्यंत कमी असून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात २६ रुग्ण दाखल आहेत. त्यातच आता या ठिकाणी नॉन कोविड सुविधा सुरू करावी, अशी मागणी समोर येत आहे. याबाबतही नियोजन सुरू असल्याचे डॉ. चव्हाण यांनी सांगितले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात ३८६ बेडची व्यवस्था आहे. त्याच्या दुपटीने मोहाडी रुग्णालयात व्यवस्था उभारण्यात आली असून रुग्ण वाढायला सुरुवात झाल्यानंतर आधी मोहाडी रुग्णालयातच रुग्ण दाखल करायचे. मनुष्यबळ एकाच ठिकाणी एकवटल्यास सुविधा चांगल्या मिळतील त्या दृष्टीने हे नियोजन सुरू आहे. शिवाय शासकीयमध्येच पुरेशी सुविधा असल्याने खासगी रुग्णालयांनाही मान्यता देताना शंभर बेडची क्षमता असलेल्यांनाच मान्यता मिळू शकते, असाही अंदाज डॉ. चव्हाण यांनी व्यक्त केला आहे.
ऑगस्टपासून तिसरी लाट?
एकत्रित ऑगस्ट महिन्यापासून रुग्ण वाढायला सुरुवात होऊन ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये कोरोनाचा पिक पिरिएड असू शकतो, हा केवळ अंदाज आहे. लोकांनी जर नियम पाळले तर आपण साथीचा काळ पुढे ढकलू शकतो, मात्र, तिसरी लाट येण्याची शक्यता अधिक असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर मोहाडी रुग्णालयातच जीएमसीच्या दुपटीने बेड उपलब्ध आहेत, असेही त्यांनी सांगितले.
तर ९० दिवसात लसीकरण पूर्ण
कोविडची तिसरी लाट थोपवायची असेल तर अधिकाधिक लसीकरण होणे गरजेचे आहे. मात्र, लसींचा मुबलक साठाच प्राप्त होत नसल्याने जिल्ह्यातील या मोहिमेला ब्रेक लागला आहे. गेल्या आठवड्यात ३८ हजार डोस प्राप्त झाल्यानंतर एकाच दिवसात विक्रमी ३६ हजार लसीकरण झाले होते. दिवसाला जर ४० हजार लस जिल्ह्याला प्राप्त झाली तर ९० दिवसात लसीकरण पूर्ण होऊ शकते, असा अंदाज आहे.