जळगाव : प्रेमकरणातून पलायन केलेल्या १४ वर्षाची अल्पवयीन मुलगी व तिचा प्रियकर या दोघांना ९ महिन्यांनी पोलिसांनी दौंड (पुणे)े येथून ताब्यात घेतले. पीडित मुलगी सात महिन्याची गर्भवती असून मुलाविरुध्द बलात्कार व बाललैंगिक अत्याचाराचे वाढीव कलम लावण्यात आले. पीडितेच्या आईने पोलीस महासंचालकांकडे दाद मागितल्याने हे प्रकरण उघडकीस आले. स्थानिक गुन्हे शाखेने दोघांना शुक्रवारी ताब्यात घेतले.पारोळा तालुक्यातील १४ वर्षाची अल्पवयीन मुलगी ज्योती व १९ वर्षाचा मुलगा आनंद (काल्पनिक नाव) दोघांनी २५ नोव्हेंबर २०१८ रोजी रात्री पलायन केले. शौचालयाचे नाव करुन मुलगी घराबाहेर पडली. बराच वेळ झाला तरी ती घरी आली नाही म्हणून पालकांनी गावात तपास केला तेव्हा त्यांना समजले की , त्यांच्या घरासमोर राहणारा १९ वर्षीय आनंद हा तिच्या मागे गेला आहे. ज्योतीच्या आईने मुलीला लग्नाचे आमिष दाखवून पळून नेल्याची फिर्याद पारोळा पोलीस स्टेशनला दिली त्यानुसार आनंदविरुध्द कलम ३६३,३६६(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.पोलीस अधीक्षकांनी ओळखले गुन्ह्याचे गांभीर्यनऊ महिन्यानंतरही मुलीचा शोध लागत नाही म्हणून पीडितेच्या आईने मुंबईत पोलीस महासंचालक कार्यालय गाठले. तेथून पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांना तपासाच्या सूचना मिळाल्या. डॉ.उगले रुजू होण्याच्या आधीचा हा विषय असल्याने त्यांनी पारोळा पोलिसांकडून माहिती घेतली. मुलगा व मुलगी एकाच गावातील व एकाच समाजातील,परंतु दोन्ही समाजात दोन गट असून कट्टर विरोधक असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बापू रोहम यांच्याकडे तपास सोपविला.दोन पथकातील समन्वय ठरला महत्वाचापलायन केलेल्या ज्योती व आनंद यांना कोणत्याही परिस्थित ताब्यात घेणे गरजेचे असल्याने निरीक्षक रोहम यांनी हवालदार शरद भालेराव, रामकृष्ण पाटील, विजय पाटील, नरेद्र वारुळे व पल्लवी मोरे यांचे पथक तयार केले. दोघं जण पुणे येथे असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर भालेराव, पाटील व मोरे यांना पुण्याला रवाना केले तर सायबर तज्ज्ञ विजय पाटील व नरेंद्र वारुळे हे स्थानिक पातळीवरुन पथकाला माहिती पुरवित होते. दोघांचे योग्य समन्वय झाल्याने ज्योती व आनंद दौंड तालुक्यातील दापोडी शिवारात आढळून आले.आम्हाला मारुन टाका...पण गावात नेवू नकापथकाने दोघांना ताब्यात घेतल्यानंतर ज्योती ही विनवण्या करीत होती. आम्हाला गावात नेवू नका, तेथे आमच्या जीवाला धोका आहे, हवे तर आम्हाला येथेच मारुन टाका..अशा गयावया करीत होती. शरद भालेराव व रामकृष्ण पाटील यांनी दोघांची समजूत काढून त्यांना थेट पारोळा पोलिसात हजर केले. शनिवारी जिल्हा रुग्णालयात वैद्यकिय तपासणी केल्यानंतर पीडितेला कुटुंबाच्या ताब्यात देण्यात आले तर मुलाला अमळनेर न्यायालयात हजर करण्यात आले.तपास उपअधीक्षक राजेंद्र ससाणे व उपनिरीक्षक सिध्देश्वर गोरे करीत आहे.
प्रेमकरणातून पलायन केलेली अल्पवयीन मुलगी ७ महिन्याची गर्भवती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2019 11:50 AM