लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : गर्भवती महिलेने कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून मास्क, सॅनिटायझर आणि शारीरिक अंतर या त्रिसूत्रीचा वापर करावा, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, सकस व संतुलित फलाहार घ्यावा. कोविड झाल्यास घाबरून न जाता आपल्या डॉक्टरांचा वेळीच सल्ला घ्यावा. वेळोवेळी आवश्यक असलेल्या चाचण्या करून घ्याव्यात आणि अत्यावश्यक असेल तरच दवाखान्यात डॉक्टरांची वेळ घेऊन जावे, असा सल्ला शहरातील स्त्रीरोग तज्ज्ञांनी दिला.
आयएमए जळगावतर्फे गुरुवारी ‘कोविड आणि गर्भावस्था’ या विषयावर तज्ज्ञांचे मार्गदर्शनपर चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. चर्चासत्रात स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ.सुदर्शन नवाल, डॉ.अंजली भिरुड, डॉ.विलास भोळे, डॉ.जितेंद्र कोळी हे सहभागी झाले होते. सोबत आयएमए जळगावचे अध्यक्ष डॉ.सी.जी. चौधरी, सचिव डॉ.राधेश्याम चौधरी यांचीही उपस्थिती होती. प्रास्ताविक डॉ.सी.जी. चौधरी यांनी केले.
कोरोनामुळे गर्भधारणा रोखू नये
प्रतिकारशक्ती मजबूत ठेवण्याचा प्रयत्न करावा. आपल्या शरीरात अनेक व्हिटॅमिन, प्रोटीनची कमतरता असते. पुरेशी झोप घ्या, नियमित व्यायाम करा. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा, डोहाळे जेवणाचा कार्यक्रम घरीच करा. प्रत्येकाने योग्य काळजी घेतल्यास १५ दिवसात कोरोना लांब जाईल. गरोदर स्त्रियांमध्ये कोविडचा संसर्ग होण्याची शक्यता अधिक असते. गरोदर स्त्रियांमध्ये लक्षणे अधिक दिसून येतात. विशेषतः शेवटच्या काही महिन्यात जास्त धोका असतो. रक्ताची गुठळी तयार होऊन ती एखाद्या रक्तवहिनीत अडकल्यास मृत्यू होऊ शकतो. रक्तस्राव वाढू शकतो. कोणतीही लक्षणे असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असा सल्ला चर्चासत्रातून डॉ.सुदर्शन नवाल यांनी दिला.
गृहविलगीकरणात राहून उपचार घ्यावे
डॉ.अंजली भिरुड म्हणाल्या की, थायरॉइड, रक्तदाब, अस्थमा, डायबिटीस, वजन जास्त असलेल्या गरोदर महिलांना कोरोनाचा धोका अधिक असतो. पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत गर्भवती महिलांना कोरोनाचा संसर्ग अधिक आहे. कोरोना संसर्ग झालेल्या महिलांच्या डिलेव्हरीत धोका उद्भवल्याचे प्रमाण कमी आहे. गर्भवती महिलेपासून पोटात असलेल्या गर्भाला कोविड होण्याची शक्यता ४ ते ६ टक्के आहे. कोरोनाची लक्षणे नाहीत किंवा अतिसौम्य लक्षणे असलेल्या गर्भवती महिलांनी गृहविलगीकरणात राहून उपचार घ्यावे. ज्या महिलांना शेवटचे महिने सुरू आहेत त्यांनीच गृहविलगीकरणात रहावे. गर्भवती महिलेला कायम मानसिक आधार द्यावा, दिवसभरात ४-५ वेळा तिच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी तपासावी. तसेच या चर्चासत्राचे सूत्रसंचालन डॉ. राध्येश्याम चौधरी यांनी केले.