लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : पंचायत राज समिती सप्टेंबर महिन्यात जिल्हा परिषदेच्या कामांचा आढावा घेण्यासाठी जिल्ह्यात येत असून या समितीसमोरील सादरीकरणाच्या तयारीसाठी जिल्हा परिषदेत शनिवारी सुटीच्या दिवशीही विविध विभागात वर्दळ सुरू होती. त्यातच गेल्या काही दिवसांपासून जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीत रंगकामही हातात घेण्यात आले आहे. दुसरीकडे जि. प. त येणाऱ्या रस्त्याचा प्रश्न मात्र, डोकेदुखी ठरण्याची चिन्हे आहेत.
जि.प.सीईओ डॉ.पंकज आशिया यांनी विविध विभागाकडून आढावा घेतला. शनिवारीही सर्वच विभागप्रमुख उपस्थित होते. अंदाज समितीच्या आढाव्यानंतर महिनाभराने लागलीच पंचायत राज समिती येणार आहे. समिती येण्याच्या अधी जिल्ह्यातील कुपोषणाचा गंभीर प्रश्न समोर आला आहे. जिल्ह्यातील एका कुपोषित बालकाच्या मृत्यूमुळे अंदाज समितीने अधिकाऱ्यांना धारेवर धरले होते. यात आदिवासी विकास विभागाच्या प्रकल्प अधिकारी विनिता सोनवणे यांना समिती सदस्यांनी विचारणा केली होती. त्यामुळे पंचायत राज समितीतही कुपोषणाचे वाढलेले आकडे व कुपोषित बालकाचा मृत्यू हा विषय गाजण्याची चिन्हे आहेत.
कामांचा व्याप,रस्त्याचा ताप
समितीसमोर फाईल्स क्लिअर राहाव्यात यासाठी अधिकारी व कर्मचारी वर्गाची धावपळ सुरू असताना दुसरीकडे मात्र, जिल्हा परिषदेत जाणाऱ्या रस्त्याचा गंभीर प्रश्न या समितीच्या दौऱ्यात समोर येणार आहे. समितीला जिल्हा परिषदेत आणायचे कोणत्या मार्गाने हा प्रश्न अधिकाऱ्यांना पडला आहे. जि. प. च्या जुन्या इमारतीसमोर शिवाजीनगर पुलाचे काम सुरू असल्याने पूर्ण रस्ता चार ते पाच महिन्यांपासून खोदून ठेवण्यात आला आहे. या ठिकाणाहून दुचाकींना व्यवस्थित जाता येत नसल्याने समितीची वाहने जातील कुठून शिवाय दुसऱ्या मार्गाने यायचे म्हटल्यास वाहने पार्क कुठे करणार हा प्रश्न अधिकाऱ्यांसमोर आहे.
२२ रोजी आढावा
पंचायत राज समिती ही २२ सप्टेंबर रोजी जिल्ह्यात येणार आहे. या समितीत ३२ आमदारांसह जिल्ह्यातील आमदार किशोर पाटील व आमदार अनिल पाटील यांचा समावेश आहे. ही समिती जि. प. प्रशासनाचा आढावा घेणार आहे. त्यामुळे अधिकारी व कर्मचारी वर्ग प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी आता शनिवार, रविवावरही जि. प. त हजेरी लावत आहेत.