लोकमत न्यूज नेटवर्क
चोपडा : येथे मुसळधार पावसाने हजेरी लावली. विजेच्या कडकडाटासह जवळपास एक ते दीड तास वरुणराजाने बरसात केली. मात्र यादरम्यान गरताड रोडवरील भवानी मंदिराजवळील शेतात झाडावर वीज पडल्याने दोन बैल भाजल्याने जागीच ठार झाले. शहरातील तारामती नगर परिसरात एका घरावर वीज पडल्याने नुकसान झाले.
रविवारी सायंकाळी साडेचार वाजता विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. तासभर चाललेल्या या पावसादरम्यान गरताड रस्त्यावरील भवानी मातेच्या मंदिराजवळीत शेतामध्ये झाडाखाली असणारे दोन बैल भाजून ठार झाले. यामध्ये ठार झालेली बैलजोडी दारासिंग दलसिंग बामणीया (पावरा)या व्यक्तीच्या मालकीची आहे. ऐन शेतीकामाच्या दिवसांमध्ये शेतकऱ्याचा खंबीर आधार असलेली बैल जोडीच या विजेच्या पडल्याने मृत्यू पावल्यामुळे तो शेतकरी व त्याचे कुटुंबीय हताश झाले होते.
दुसरी घटना शहरातील तारामती नगर येथील आहे. त्याठिकाणी गोविंदा शिवाजी चौधरी यांच्या घरावर वीज पडल्याची घटना घडली. मात्र सुदैवाने कुठलीही मनुष्य जीवितहानी झाली नाही. त्यांच्या घराच्या भिंतीला विजेच्या धक्क्याने भेगा पडल्या आहेत. त्याचप्रमाणे त्यांच्या घरातील टीव्ही, फ्रिज व इतर इलेक्ट्राॅनिक वस्तू यामुळे खराब झाल्या आहेत. वर्डी परिसरात मुसळधार पाऊस पडल्याने त्या परिसरात नदी-नाल्यांना पूर आला होता. पुराचे पाणी गावाच्या गल्लीतून वाहत असल्याने पूरसदृश स्थिती वर्डी गावात दिसत होती. शासकीय यंत्रणेने घडलेल्या घटनेचे तत्काळ पंचनामे करून संबंधित व्यक्तींना नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी होत आहे.