चाळीसगाव : पंतप्रधान आवास योजनेसह राज्य शासनाच्या शबरी व रमाई महाआवास ग्रामीण अभियानाचा मंगळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऑनलाइन राज्यस्तरावर आढावा घेतला. यात चाळीसगावचे गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर यांच्या संकल्पनेतून तयार करण्यात आलेल्या ‘घरकुला’चे प्रत्यक्ष सादरीकरण केले गेले. खान्देशातून ही एकमेव संधी चाळीसगावला मिळाली आहे.
या तीनही योजनेंतर्गंत तालुक्यातील लाभार्थ्यांनी ४२३५ घरे बांधून पूर्ण केली आहे. मात्र यापुढे ज्यांना घरे बांधायची आहेत, त्यांच्यासाठी डेमो हाऊस पथदर्शी ठरणार आहे.
घरकुले पूर्ण करण्यासह त्याचा दर्जा राखत ते कमी वेळेतही तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवून ग्रामीण भागात २० नोव्हेंबर २०२० रोजी महाआवास ग्रामीण अभियान राज्यभर सुरू करण्यात आले. रमाई, शबरी यांच्यासह पंतप्रधान आवास योजनेनुसार यात लाभार्थ्यांना घरकुले मंजूर करण्यात आली. यासाठी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात १ लाख २० हजार रुपये टाकण्यात आले. तथापि, लाभार्थ्यांनी आपापल्या पद्धतीने घरे बांधून पूर्ण केली. निश्चितच असा आराखडा यासाठी वापरला गेला नाही.
डेमो हाऊसमुळे हा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. डेमो हाऊसनुसार घरकूल उभारल्यास लाभार्थ्यांना ते अधिक फायदेशीर ठरणार आहे. घरकुले अटींनुसार तयार करावयाची असल्याने यासाठी शंभर गुणही निर्धारित करण्यात आले होते. दर्जेदार घरांच्या निर्मितीसाठी गवंडी बांधवांचे प्रशिक्षण घेणेही आवश्यक केले गेले. यातही जिल्ह्यात असे प्रशिक्षण घेणारा चाळीसगाव तालुका एकमेव ठरला आहे. डेमो हाऊसची रचना कौतुकास्पद असल्याची प्रतिक्रिया खासदार उन्मेष पाटील, आमदार मंगेश चव्हाण, सभापती अजय पाटील, उपसभापती सुनील पाटील यांनी व्यक्त केली आहे.
४२३५ घरकुले तयार
धुळेरोडस्थित सिंचन विभागाच्या आवारात हे ‘डेमो हाऊस’ तयार करण्यात आले असून ते लाभार्थ्यांनाही पाहता येते. पंतप्रधान आवास योजनेंतर्गंत ३ हजार ३२३ तर रमाई योजनेंतर्गंत ७०८ व शबरी महाआवास योजनेंतर्गंत २०१० घरकुले पूर्णत्वास गेली आहे. तालुक्यासाठी या तिन्ही योजनेंतर्गत सहा हजाराहून अधिक घरकुलांचे उद्दिष्ट निर्धारित केले आहे. लवकरच घरकुलाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. पात्र लाभार्थ्यांशिवाय अन्य राहून गेलेल्या नागरिकांसाठीही आगामी काळात अशी घरकुले तयार करण्यात येणार आहे.
घराची किंमत २ लाख २० हजार रुपये
वाळू व सिमेंटचा नगण्य वापर करून पर्यावरणस्नेही अशा डेमो हाऊसनुसार घरकूल उभारणीसाठी २ लाख २० हजार रुपये खर्च होतो.
१. नळ कनेक्शन, वीज आदि सुविधादेखील शासनाच्या विविध योजनांमधून दिल्या जाणार आहे. यासाठी ४८ हजार रुपये खर्च येणे अपेक्षित आहे.
२. बैठक हाॕल, बेडरूम, किचन, शौचालय, स्नानगृह अशी डेमो हाऊसची रचना आहे.
महाआवास अभियानातील लाभार्थ्यांना पर्यावरणस्नेही घरकूल उभारता यावे, यासाठीच डेमो हाऊसची उभारणी केली गेली. मुख्यमंत्र्यांच्या ऑनलाइन आढावा बैठकीत त्याचे सादरीकरण करण्याची संधीही मिळाली. वाळू व सिमेंट अत्यल्प प्रमाणात वापरुन डेमो हाऊस तयार केले आहे. लाभार्थ्यांनी ते आवर्जून पहावे.
-नंदकुमार वाळेकर,
गटविकास अधिकारी, पं.स. चाळीसगाव
===Photopath===
170621\17jal_2_17062021_12.jpg
===Caption===
महाआवास ग्रामीण अभियानासाठी पं. स.चे गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर यांच्या संकल्पनेतून तयार करण्यात आलेले डेमो हाऊस. (छाया - जिजाबराव वाघ